Join us

‘अॅट्रॉसिटी’ चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 12:21 PM

वास्तववादी सिनेमा मनोरंजनासोबतच समाजातील विदारक सत्य आपल्यासोमर मांडण्याचं कामही करीत असतात. ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमातूनही आजच्या समाजातील ज्वलंत ...

वास्तववादी सिनेमा मनोरंजनासोबतच समाजातील विदारक सत्य आपल्यासोमर मांडण्याचं कामही करीत असतात. ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी सिनेमातूनही आजच्या समाजातील ज्वलंत वास्तव पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा नुकताच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध लेखक–दिग्दर्शक दिलीप शुक्ला यांच्या हस्ते दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाला मन:पूर्वक शुभेच्छा देत लेखक–दिग्दर्शक दिलीप शुक्ला म्हणाले की, आशयाच्या बाबतीत मराठी चित्रपट कायमच मला आवडत आला असून ‘अॅट्रॉसिटी’च्या निमित्ताने एक मह्त्त्वपूर्ण विषय रसिकांसमोर येत असल्याचा मला आनंद आहे. आजवर नेहमीच दैनंदिन जीवनातील मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकत चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शक दिपक कदम यांनी ‘अॅट्रॉसिटी’चं दिग्दर्शन केलं आहे. आर. पी. प्रोडक्शनची प्रस्तुती असलेला ‘अॅट्रॉसिटी’ १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.कायदे बनतात आणि त्यातून बचावासाठी पळवाटाही काढल्या जातात, पण ज्यांच्यासाठी कायदे बनतात त्यांना मात्र त्याबाबत फारशी माहिती नसते. ‘अॅट्रॉसिटी’ हा देखील एक असाच कायदा आहे, ज्याबाबत समाजात विशेष जागृती नाही. त्यामुळे समाजातील ज्या दुर्बल घटकांसाठी हा कायदा बनवण्यात आला ते याचा उपभोग घेऊ शकत नाही. अशा घटकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने निर्माते डॉ. राजेंद्र पडोळे यांनी  ‘अॅट्रॉसिटी’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.यतिन कार्येकर, लेखा राणे, गणेश यादव, विजय कदम, सुरेखा कुडची, डॉ, निशिगंधा वाड, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे या अनुभवी कलाकारांच्या जोडीला ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल या नवोदित कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत. कॅमेरामन राजेश राठोड यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं असून, मधू कांबळे यांनी कलादिग्दर्शन केलं आहे. कलाकारांच्या निवडीची जबाबदारी राजेंद्र सावंत यांनी पार पाडली आहे, तर संकलनाचं काम विनोद चौरसिया यांनी केलं आहे. बिरू श्रीवास्तव या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, विनोद बरई व राजेंद्र सावंत प्रोडक्शन कंट्रोलर आहेत.‘अॅट्रॉसिटी’मध्ये मांडण्यात आलेल्या वास्तववादी कथानकामध्ये मनोरंजक मूल्यांचा समावेष करीत गीत-संगीताची जोड देण्यात आली आहे. गीतकार अनंत जाधव, मंदार चोळकर, अखिल जोशी, विजय के. पाटील यांनी ‘अॅट्रॉसिटी’मधील गीतं लिहिली असून, संगीतकार अमर-रामलक्ष्मण यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. आनंदी जोशी, वैशाली सामंत, जान्हवी प्रभू-अरोरा, शशिकांत मुंबारे, नंदेश उमप, सौरभ पी. श्रीवास्तव यांनी या गीतरचना गायल्या आहेत. अनिल सुतार आणि जस्मिन ओझा यांनी कोरिओग्राफी केली आहे. १२ जानेवारीला ‘अॅट्रॉसिटी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.