पूर्वा गोखले करणार छोट्या पडद्यावर कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 12:45 PM
पूर्वा गोखलेने कोई दिल में है या हिंदी मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेत ती करिश्मा तन्नासोबत झळकली ...
पूर्वा गोखलेने कोई दिल में है या हिंदी मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेत ती करिश्मा तन्नासोबत झळकली होती. या मालिकेतील भूमिकेची चर्चा झाल्यामुळे तिला हिंदीत अनेक ऑफर मिळत गेल्या. त्यानंतर तिने कहानी घर घर की या मालिकेत काम केले. हिंदीत यश मिळाल्यानंतर ती मराठी मालिकांकडे वळली. कुलवधू या मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेचेदेखील कौतुक करण्यात आले होते. तसेच तिने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. सेल्फी, समाइल प्लीज सारख्या नाटकातील तिच्या भूमिकांचेदेखील प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. पूर्वा ही छोट्या पडद्यावरचे एक महत्त्वाची कलाकार मानली जात होती. पण ती गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यापासून दूर आहे. पूर्वाने काही वर्षांपूर्वी लग्न केले. संसारात आणि मुलीत रमल्यानंतर तिने छोट्या पडद्यावर काम करणे कमी केले होते. पण आता अनेक वर्षांनंतर ती परतत आहे. तिच्या कमबॅकसाठी ती खूप उत्सुक आहे. झी युवा वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका येत असून या मालिकेत पूर्वा एका प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. पूर्वा अनेक वर्षांनंतर मालिकेकडे वळल्यामुळे तिच्या फॅन्सना चांगलाच आनंद होणार आहे यात काहीच शंका नाही. पूर्वा गोखलेचे खरे नाव पूर्वा गुप्ते आहे. तिचे शिक्षण ठाण्यात झाले असून ती उत्कृष्ट अभिनेत्रीसोबत एक चांगली नर्तिकादेखील आहे. तिने शास्त्रीय संगातीत शिक्षण घेतले आहे. तसेच तिने चित्रपट, मालिका आणि नाटकांसोबत बुंदे या एका म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे.