मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं निधन झालं आहे. प्रदीप पटवर्धन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच एक हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. गिरगाव येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. प्रदीप पटवर्धन यांची मोरूची मावशी या नाटकातील भूमिका अतिशय गाजली होती. या भूमिकेने प्रत्येकाच्या मनात घर केले होते. प्रदीप पटवर्धन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट, नाटक, मालिका केल्या. नाटकात काम करतानाचा प्रदीप यांचा एक किस्सा अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमात सांगितला गेला होता.
प्रदीप पटवर्धन यांचे जवळचे मित्र विजय पाटकर यांनी हा किस्सा सांगितला होता. मोरुची मावशी नाटक यशाच्या शिखरावर असताना प्रदीप पटवर्धन नाटकांची तिकिटे ब्लॅकमध्ये विकायचे असे ते म्हणाले होते. हे ऐकल्यावर प्रदीप यांचा चेहरा फारच केविलवाणा झाला होता. विजय पाटकरांनी पुढे सांगितले की, प्रदीप निर्माते सुधीर भटांकडून काही तिकिटं घ्यायचा आणि नंतर ती ब्लॅकमध्ये विकायचा. नाटकाची नाईट नी त्यावर हे वरचे पैसे, कुठल्या नटाला हे सुचेल सांगा.' विजय पाटकरांचे म्हणणे ऐकल्यावर प्रदीप पटवर्धन यांनीही आपली बाजू सावरली होती. 'मी कशाला तिकिटं ब्लॅक करीन, चांगली नोकरी करत होतो मी. माझ्या एण्ट्रीने मोरुची मावशी नाटक सुरू व्हायचे. तर मी तिथे एन्ट्री घेऊ की खाली तिकिटं ब्लॅकमध्ये विकत बसू,' असं सांगत पाटकर चेष्ठा करत असल्याचं सांगितले.