Join us

'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:06 AM

कोणा एका व्यक्तीच्या प्रतिक्रियेसाठी नाही तर.... प्राजक्ता काय म्हणाली?

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali)  'फुलवंती' सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये तिने नर्तिकेची भूमिका साकारली आहे. महाराष्ट्रभर हा सिनेमा गाजतोय. बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर हा सिनेमा आधारित आहे. मनसे नेते राज ठाकरे हे बाबासाहेब पुरंदरेंच्या अगदी जवळचे होते. तसंच प्राजक्ताची मधल्या काळात राज ठाकरेंशी ओळख झाली होती. त्यामुळे राज ठाकरेंनी (Raj Thackeray) 'फुलवंती' सिनेमा पाहिला का? सिनेमा बनवताना त्यांची काय  मदत झाली? या प्रश्नांची उत्तरं प्राजक्ता माळीने नुकतीच दिली आहेत.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता माळीला प्रश्न विचारण्यात आला. राज ठाकरे बाबासाहेब पुरंदरेंच्या जवळचे होते. त्यामुळे त्यांची काही मदत झाली का? यावर प्राजक्ता म्हणाली, "आधी मी हक्क घेतले. त्यानंतर सहा महिन्यांनी माझी राज ठाकरेंशी भेट झाली. ओळखच त्यानंतर झाली. त्यामुळे तशी मदत झाली नाही. पण त्यांना मी भेटल्यावर सांगितलं की मी अशा अशा कादंबरीचे हक्क विकत घेतलेत. त्यांना हे ऐकून आनंद झाला. त्यांनी चौकशी केली की दिग्दर्शनासाठी कोणाचा विचार करताय? कॅमेरा कोण हँडल करतंय? कलाकारांचं काय? असे प्रश्न विचारले. कथेसंदर्भात काही गोष्टी सुचवल्या.  त्यामुळे जेव्हा भेट झाली तेव्हाच त्यांनी फुलवंती विषयी माहिती दिली."

राज ठाकरेंना सिनेमा दाखवला का? त्यांची प्रतिक्रिया मिळाली का? यावर प्राजक्ता म्हणाली, "नाही. अजून थोडं काम राहिलं आहे. पूर्ण सिनेमा अजून मीही नाही पाहिला आहे. त्यामुळे अजून कोणालाच नाही दाखवला आहे. पूर्ण झाल्याशिवाय काय दाखवणार. दाखवूही नये.

प्रतिक्रियेविषयी ती म्हणाली, "एका व्यक्तीविषयी केंद्रित राहणं हा माझा मूळ स्वभाव नाही. कोणा एका व्यक्तीसाठी, त्यांच्या प्रतिक्रियेसाठी आपण काही करत नाही. मी तर नाहीच नाही. मी हा अख्खा जगासाठी बनवलेला सिनेमा आहे. भारताबाहेरही हा सिनेमा पोहोचावा असं माझं म्हणणं आहे. मी लाखो लोकांच्या प्रतिक्रियेसाठी उत्सुक आहे. सगळ्यांच्याच प्रतिक्रिया माझ्यासाठी महत्वपूर्ण आहेत."

'फुलवंती' रिलीज व्हायच्या आधी प्राजक्ताने ही मुलाखत दिली होती. प्राजक्ता मधल्या काळात राज ठाकरेसोबत अनेकदा दिसली होती. तिच्या पुस्तकाचं प्रकाशनही त्यांच्या हस्ते झालं होतं. मात्र अचानक ती भाजपाच्या मंचावर दिसली आणि नंतर तिला पुन्हा मनसेसोबत पाहिलं गेलं नाही. विशेष म्हणजे ११ ऑक्टोबर 'फुलवंती' ची रिलीज डेट असून राज ठाकरे प्रमोट करत असलेला 'येक नंबर' सिनेमाही त्याच दिवशी रिलीज झाला.

टॅग्स :प्राजक्ता माळीराज ठाकरेमराठी चित्रपटमराठी अभिनेता