Join us

"मागे वळून पाहताना.", प्राजक्ता माळीची 'फुलवंती'साठी खास पोस्ट; शेअर केल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 16:39 IST

'फुलवंती' सिनेमाचा प्रवास म्हणजेच सुरुवात ते शेवटपर्यंतच्या सगळ्या आठवणींचा एक व्हिडिओच तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) ड्रीम प्रोजेक्ट म्हणजेच 'फुलवंती' (Phullwanti) सिनेमा ५० दिवसांपासून सिनेमागृहात सुरु आहे. बाबासाहेब पुरंदरेंच्या 'फुलवंती' या कादंबरीवर सिनेमा आधारित आहे.य या सिनेमासाठी तिने खूप कष्ट घेतले. प्रवीण तरडेंनी सिनेमाची निर्मिती केली तर त्यांची पत्नी स्नेहल तरडेने या सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. 'फुलवंती'ला मिळालेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल प्राजक्ताने खास पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

'फुलवंती' सिनेमाचा प्रवास म्हणजेच सुरुवात ते शेवटपर्यंतच्या सगळ्या आठवणींचा एक व्हिडिओच तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिनेमा साईन करण्यापासून ते प्रमोशन, रिव्ह्यू पर्यंतचा सगळा प्रवास तिने दाखवला आहे. यासोबत प्राजक्ता लिहिते, "मागे वळून पाहताना… (अथ ते इति पर्यंत- महत्वाचे गोड टप्पे.) आज 'फुलवंती'ला चित्रपटगृहात ५० दिवस पुर्ण झाले. (पुढे प्रवास चालूच आहे.) हल्ली इतर अनेक माध्यमांमुळे, सोशल मीडियासारख्या असंख्य गोष्टींमुळे, खूप कमी चित्रपटांच्या नशिबात हा सुदिन येतो. आम्ही खरेच भाग्यवान.. (लवकरच पार्टी करणार आहोत.) ह्या यशासाठी तमाम महाराष्ट्राचे मनापासून आभार. तुमची ऋणी आहे."

'फुलवंती' सिनेमा ११ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. अजूनही काही ठिकाणी हा सिनेमा सुरुच आहे. प्राजक्ता, गश्मीर महाजनी आणि इतर कलाकारांनी सिनेमात अप्रतिम काम केलं. प्राजक्ताने यामध्ये भरभरुन नृत्याचा आनंद घेतला. सध्या सगळीकडेच तिचं खूप कौतुक होत आहे. आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवरही रिलीज झाला आहे. 

टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेतागश्मिर महाजनीमराठी चित्रपटसोशल मीडिया