प्राजक्ता माळी सांगतेय, या कारणामुळे स्वतःला समजते भाग्यवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 03:00 PM2021-03-23T15:00:40+5:302021-03-23T15:03:19+5:30
प्राजक्ता सध्या पुण्याला तिच्या घरी गेली असून तिने तिच्या घराच्या अंगणातून हा व्हिडिओ शूट केला आहे.
प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेला एक व्हिडिओ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
प्राजक्ता सध्या पुण्याला तिच्या घरी गेली असून तिने तिच्या घराच्या अंगणातून हा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओत प्राजक्ताचे आपल्याला केवळ पाय दिसत असून ती तिच्या घराच्या अंगणात चालताना दिसत आहे. या व्हिडिओसोबत तिने लिहिले आहे की, माझ्याकडे एक छोटेसे अंगण असून त्यात खूप सारी झाडे आहेत आणि या अंगणात मी उघड्या पायांनी फिरू शकतो यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. अशाप्रकारे चालल्याने तुमचा रक्तप्रवाह चांगल्याप्रकारे होतो. त्यामुळे असे चालणे तुमच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. पंचमहाभूतांच्या सहवासात रोज येण्याची आवश्यकता असल्याचे आयुर्वेदात सांगितलेले आहे. कारण आपले शरीर हे पंचमहाभूतांनीच बनलेले आहे.
प्राजक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केवळ 20 तासांत एक लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. प्राजक्ताेचे हे मत अगदी योग्य असल्याचे लोक तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.
प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.