Join us  

लहान तोंडी मोठा घास, पण आता बोलायला हवं..., प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 10:01 AM

Prajakta Mali Video : महाराष्ट्राची लाडकी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. होय, प्राजक्ताने एक व्हिडीओ शेअर करत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक साद घातली आहे.

Prajakta Mali Video : महाराष्ट्राची लाडकी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. होय, प्राजक्ताने एक व्हिडीओ शेअर करत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक साद घातली आहे. लहान तोंडी मोठा घास, पण आता बोलायला हवं, असं म्हणत प्राजक्ताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

या व्हिडीओद्वारे तिने महाराष्ट्र सरकारला चित्रपटगृह 100 टक्के आसनक्षमतेने सुरु करण्याची कळकळीची विनंती केली आहे. ‘लहान तोंडी मोठा घास...पण आता बोलायला हवे. सर्व मराठी रसिक सुज्ञ आहेत, करोना नियमांचं पालन करून ते कलाकृतींचा आस्वाद घेतील अशी आम्हांला खात्री वाटते. तरी आमची विनंती विचारात घ्यावी, ’ असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

प्राजक्ता माळी व्हिडीओत म्हणते,

 ‘नमस्कार, नुकताच आमच्या पावनखिंड (Pawankhind ) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सर्वच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. 18 फेब्रुवारीला पावनखिंड चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्याही चित्रपटावर प्रेक्षक मनापासून प्रेम करतील. प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. पण फक्त आता सरकारलाच विनंती आहे की, कोरोनाचा जोर ओसरला आहे. सर्वच नियम बऱ्यापैकी  शिथील करण्यात आले आहेत. फक्त चित्रपटगृह आणि नाट्यगृहच ५० टक्के आसनक्षमतेने सुरु आहेत, असं का?   शिवजयंती तोंडावर आहे. त्या निमित्ताने सर्व शिवप्रेमींना, सगळ्या चित्रपट निर्मात्यांना, सगळ्यांना रंगकर्मींना 100 टक्के आसनक्षमतेने सर्व चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु झाली आहेत, ही आनंदाची बातमी द्याल,अशी आम्हाला आशा आहे.  100 टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृह आणि नाट्यगृह सुरु व्हावीत. त्याचा आम्हा सर्व कलाकारांना आणि चित्रपट निर्मात्यांना खरच खूप फायदा होईल,ही सरकारला नम्र विनंती. प्रेक्षकांना पण नम्र आवाहन की, त्यांनी   हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा,’ असं प्राजक्ता माळीने या व्हिडीओत म्हटले आहे.

 प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, चिन्मय मांडलेकर, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी आणि शिवराज वायचळ यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यामुळे या खिंडीला पुढं पावनखिंढ हे नाव पडलं. पावनखिंडींचा हाच रणसंग्राम ‘पावनखिंड’ या चित्रपटात दाखवला जाणार आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी