'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांच्या आवडीचा शो. या शोमध्ये स्वतःच्या खुमासदार शैलीत प्राजक्ता माळी सूत्रसंचालन करतेय. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असते. प्राजक्ता सध्या अनेक राजकीय कार्यक्रमांमध्येही उत्साहाने भाग घेते. प्राजक्ता नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्चासोबत एकाच मंचावर दिसली होती. आता नुकताच प्राजक्ताने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात आगामी पुणे मतदान टप्प्याबद्दल प्राजक्ताने काळजी व्यक्त केलीय.
प्राजक्ता व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "नमस्कार मी प्राजक्ता माळी. आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की सध्या सगळीकडे निवडणुकांचं वारं वाहतंय. पण मतदानाचा टक्का घसरला, टक्केवारी घसरली असं ऐकून खरंच खूप दुःख होतं. तर मंडळी १३ मेला पुण्यात मतदान होतंय. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. त्यामुळे मला खात्री वाटते की, पुणेकर नक्कीच मतदान करायला जातील. आणि टक्केवारी यावेळी वाढेल अशी मला आशा आहे. तुम्हा सर्वांना हीच विनंती की कृपया सुट्टीचा सदुपयोग करा. आपल्या मतदानाचा हक्क बजावा. आणि जरूर मतदान करा. धन्यवाद!"
पुण्यात १३ मेला मतदान आहे. त्यामुळे यावेळी मतदानाचा आकडा वाढणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे. प्राजक्ता माळीबद्दल बोलायचं झालं तर.. ती सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सूत्रसंचालन करताना दिसतेय. याशिवाय 'प्राजक्तराज' या व्यवसायाबद्दल सुद्धा प्राजक्ता वेळोवेळी अपडेट देत असते. प्राजक्ता आगामी 'भिशी मित्र मंडळ' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.