प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. तिने अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. प्राजक्ताचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. तिला अनेकदा कमेंटमध्येही चाहते प्रपोज करत असतात. अशाच एका शेतकरी मुलाने प्राजक्ताला पत्र लिहून थेट लग्नाची मागणी घातली आहे.
प्राजक्ताने नुकतीच जयंती वाघधरेच्या 'आम्ही असं ऐकलंय' या पॉडकास्टला हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये प्राजक्ताने लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्याबरोबरच लग्न करण्यासाठी तयार असल्याचंही प्राजक्ताने सांगितलं. हे सांगताना प्राजक्ताने शेतकरी मुलाच्या पत्राचा किस्सा सांगितला. "मी आता आईला माझ्यासाठी मुलगा शोधण्याची परनावगी दिलीये. आईला खरंच दोन पत्र आली आहेत. आणि मला ती इतकी आवडली आहेत की मला असं वाटतंय की खरंच त्यांना फोन लावावा", असं ती म्हणाली.
पुढे तिने सांगितलं, "त्यातील एका पत्रामध्ये त्यांनी खूप प्रांजळपणे म्हटलंय की मी शेतकरी आहे. मला माहितीये की मी खूप वेगळ्या लेव्हलचं बोलतोय. तुमचं प्रोफेशन वेगळं आहे. पण, मला हे सांगायचं आहे की मी शेतकरी आहे आणि मी शेतीच करणार. तुम्हाला हे आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. मला हे इतकं आवडलं की मी म्हटलं हे किती गोड आहे. आधी मी या सगळ्या गोष्टींसाठी तयार नव्हते. ही डोकेदुखी नको असं मला वाटायचं. पण, आता मी आईला म्हटलंय आता तू माझ्यासाठी मुलगा शोधूनच आण. मला बघायचंच आहे आता कोण आहे तो मुलगा...मी तयार आहे".