राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा यज्ञ मांडला. हा यज्ञ पूर्णत्वास नेण्यासाठी स्वराज्याच्या चरणी आपला जीव वाहणारे राजांचे साथीदार होतेच पण त्याच बरोबर होत्या पोलादाचं काळीज असलेल्या आणि जिजाऊंच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या स्वराज्यातील सर्व माता देखील होत्या. या मातांवर आधारीत अंगाई क्षणपतूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या अंगाई मध्ये स्वराज्याच्या लढाईसाठी मुलाला तयार करणाऱ्या आईचे कणखर रूप अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने साकारले आहे.
प्राजक्ता माळी हिने हळव्या आणि कणखर आईचे रूप साकारले आहे व हरक भारतीया याने त्या स्वराज्याचा मावळा होण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेला लहान मुलगा साकारला आहे. या शिवकालीन अंगाईचे गीत लेखन व दिग्दर्शन अनघा काकडे हिने केले आहे.
नुपूरा निफाडकरने ते संगीतबद्ध केले असून तिनेच त्याचे पार्श्वगायनही केले आहे. ही Do Re-Do प्रोडक्शन्सची निर्मिती आहे व राजश्री मराठीच्या युट्युब चॅनेलवर ही शिवकालीन अंगाई प्रसिद्ध झाली आहे.
मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये तिने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.