Join us

प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....

By तेजल गावडे | Published: October 09, 2024 6:29 PM

Prajakta Mali And Gashmeer Mahajani : पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 'फुलवंती' ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 'फुलवंती' (Phulwanti Movie) ही भव्य कलाकृती ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे लेखन-संवाद प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे यांनी केले आहे. कुमार मंगत पाठक,अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आणि गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ता आणि गश्मीरशी केलेली ही बातचीत...

- तेजल गावडे

प्राजक्ता - तू निर्मिती क्षेत्रात पदार्पण करायचे का ठरविले?: नवनवीन गोष्टी हाताळायला मला आवडतात. निर्माती म्हणून नवीन प्रवासाची ही सुरूवात आहे. इतके वर्ष इंडस्ट्रीत काम करताना नेहमी प्रोजेक्टसंदर्भात बऱ्याच गोष्टी कराव्याशा वाटत होत्या. पण कलाकाराच्या हातात कमी निर्णय किंवा काहीच नसते. त्यामुळे आपणही चांगल्या कलाकृतीची निर्मिती केली पाहिजे असे वाटत होते. एक कलाकार म्हणून सिनेइंडस्ट्रीला आपण काहीतरी देणे लागतो. या हेतूने हे सगळे सुरू झाले. यात सगळ्यांची मला साथ लाभली. देवाचे आशीर्वाद माझ्या पाठिशी होते. हे सर्व घडले आणि मी याचे एक माध्यम ठरले, याचा मला आनंद आहे. आतापर्यंतची सर्वात भव्य कलाकृती आम्ही 'फुलवंती'च्या माध्यमातून घेऊन येत आहोत, याचा मला खूप अभिमान आहे. 

प्राजक्ता - आतापर्यंत तू बरेच सिनेमे केले आहेस, पण तुला हवी तशी ओळख मिळाली नाही. 'फुलवंती'मधून तुला ही ओळख मिळेल, असे वाटते का?नक्कीच. फुलवंती हा चित्रपट मला नवीन ओळख मिळवून देईल, यात काही शंका नाही. मला माझ्या आयुष्यात कोणत्याच गोष्टीची खंत वाटत नाही. जे होते, जेव्हा होते, ते तुमच्या भल्यासाठी होत असते. कदाचित आधीच्या काही चित्रपटांनी मला अभिनेत्री म्हणून संतुष्ट केले असते तर मी फुलवंती बनवलाच नसता. कदाचित तिथे मी असंतुष्ट राहिले म्हणून मी हा चित्रपट बनवण्यासाठी पुढे सरसावले असेन. हे देवानेच घडवून आणले असेल. 

गश्मीर - प्राजक्ताबद्दल काय सांगशील?प्राजक्ताने 'फुलवंती'मध्ये खूप चांगलं बॅटिंग केले आहे. मी पण थक्क झालो; कारण 'फुलवंती'चा इंटरव्हलचा सीन बघण्यासारखा आहे. मला वाटते की आतापर्यंत मी जेवढे चित्रपट केले. त्यातला आतापर्यंतचा सर्वात बेस्ट इंटरव्हल पॉइंट 'फुलवंती'मधला आहे. इंटरव्हलनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढणार आहे, याची मला खात्री आहे.

गश्मीर - सिनेमात तू प्रोस्थेटिक मेकअप केला आहेस, त्याबद्दल सांग.प्रोस्थेटिक मेकअप खूप टफ आहे. त्यापेक्षा टक्कल केले असते तर बरे झाले असते असे वाटले. फुलवंतीचे १६ तास शूटिंग चालायचे. प्रोस्थेटिक मेकअप टिकून राहावा म्हणून व्हॅनिटीत एसीमध्ये बसायचो. अंगाचा बर्फ होत होता, मात्र टक्कल १६ तास टिकायला हवे, त्यासाठी शाल, स्वेटर घालून बसायचो. पुढच्या सीनला ८ तास लागणार असतील तरी तसेच बसून राहावे लागत होते. त्यामुळे मी यानंतर पुन्हा प्रोस्थेटिक करणार नाही. हे फार कठीण असते. त्यामुळे खरे टक्कल केलेले कधीही परवडेल.

प्राजक्ता - 'फुलवंती'च्या निमित्ताने तुला डान्सरची भूमिका जगायला मिळाली का?: हो. चित्रपटाच्या निमित्ताने डान्सरची भूमिका जगायला मिळाली. ती जगायला मिळावी म्हणूनच चित्रपट निर्मिती केली असावी असे मी म्हणेन. मी भरतनाट्यम विशारद आहे. त्यात अलंकार केले. बीए, एमए आणि अरंगेत्रम केले. पूर्वी हिंदी आणि मराठी सिनेमात क्लासिकल डान्स असायचे. हल्ली पाश्चिमात्य संस्कृतीमुळे हिपहॉप, साल्सा डान्स प्रकार पाहायला मिळत आहे. ह्याला माझा विरोध नाही. ती देवाणघेवाण आहे. मात्र आपण आपली मूळे विसरत आहोत आणि आपली मूळ स्टाईल विसरत आहोत. आपल्याला इतका मोठा सांस्कृतिक, सांगितिक, नृत्याचा वारसा आहे. आपल्याकडे चित्रपट हे मोठे माध्यम असूनही त्यात आपण हे वापरत नाही आहोत. त्यामुळे मला भरतनाट्यम चित्रपटात आणायचे होते. मी या इंडस्ट्रीत आहे आणि जे भरतनाट्यम मी शिकली आहे. तर माझ्याकडून माझ्या नृत्यशैलीला आदरांजली दिली आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळीगश्मिर महाजनी