कोरोनाने सर्वत्रच थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊनही जाहीर करण्यात आले आहे. कोरोना काळात प्रत्येकालाचा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांना दोन वेळच्या जेवणासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहेत. अशा कठिण प्रसंगी प्रत्येकजण जमेल तशी प्रत्येकाला मदत करताना दिसत आहे.
अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा हात पुढे करत मैदानात उतरले आहेत. कोणी रक्तदान करतंय, तर कोणी अन्नदान करतंय प्रत्येकाला जशी जमेल तशी तो मदत करताना दिसत आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरेनेदेखील आता मदतीसाठी पुढे आली आहे. प्रार्थनानं स्वत: काढलेली काही पेटींग्स विकून त्यामधून मिळालेल्या पैशांद्वारे गरजुंची मदत करण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. खुद्द प्रार्थनानेच सोशल मीडियावर तिच्या या खास उपक्रमाची माहिती चाहत्यांसह शेअर केली आहे.
पोस्ट शेअर करत प्रार्थनाने लिहीले आहे की, कोरोनामुळे अनेकांना शारीरिक व आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागतंय ,आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला खूप हाल सोसावे लागतायेत.अशावेळी मी त्यांच्यासाठी काय करू शकते? हा विचार नेहमी माझ्या मनात होता ? लॉकडाउनच्या काळात मी पेंटिंग करायला सुरवात केली आणि त्याच वेळी मला माझ्या मैत्रिण @rjsmee कडून ह्या पेटिंग्स विकून, त्या रकमेतून गरजू लोकांना मदत करण्याची कल्पना सुचली.
स्वतःच आर्ट विकायला कोणालाच आवडत नाही. पण मी हे पेंटिंग पैसे कमावण्यासाठी विकत नसून यामधून मिळणारी सर्व रक्कम समाज कार्यासाठी वापरायचे ठरवले आहे. माझ्याकडून एक मदत म्हणून मी हा उपक्रम राबवत आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्वांची मदत हवी आहे.हे पेंटिंग विकायला आहेत म्हणून घेऊ नका, तर ते पैसे तुम्ही समाज कार्यासाठी दान करत आहेत अशी भावना ठेवा आणि त्या बद्दल माझ्या कडून हे पेंटिंग रिटर्न गिफ्ट आहेत असे समजा. जे लोकं पेंटिंग विकत घेतील त्या सर्वांना लॉकडाउन संपल्यावर कुरिअरने ते घरपोच पाठवले जातील. मी स्वतः त्यांना संपर्क करेन.ह्या उपक्रमा मधून मिळणारा आनंद, समाधान आणि तुमचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. तर तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर ह्या उपक्रमात सामील व्हावे हीच प्रार्थना.