आईपण हे महान आहेच, पण हे सुख अनुभवण्यासाठी थोडा वेळ लागत असेल तर तो प्रवासही त्या आई होणाऱ्या स्त्रीसाठी सुखद असायला हवा, हलकाफुलका असायला हवा. आई होण्याच्या याच संवेदनशील भावनेला विनोदाच्या गोडव्यातून सादर करणारं नाटक गेल्या वर्षी रंगमंचावर आलं आहे ज्याचं नाव आहे कुर्रर्र. विनोदाची भट्टी असलेल्या प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे या चौकडीने कुर्रर्र नाटक भन्नाट बनवलं आहे. झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड सोहळ्यात कुर्रर्र आवाज , घुमल्याशिवाय राहणार नाही. झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळा ९ ऑक्टोबरला झी टॉकीज या वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.
कुर्रर्रर्र हा शब्द माणसाच्या कानात त्याला आयुष्यात एकदाच ऐकायला मिळतो. आई या शब्दा शिवाय दुसऱ्या कुणीतरी बाळाच्या कानात म्हटला जाणारा हा पहिला शब्द. बाळासाठी आणि त्याच्या आईसाठी कुर्रर्र हा शब्द घुमतो तो पाळण्यात. जन्मानंतर बाराव्या दिवशी. जिला आई व्हायची इच्छा आहे तिच्यासाठी तर हा शब्द लग्न झाल्यापासूनच मनात रूंजी घालत असतो. आजही लग्नानंतर मातृत्वाची चाहूल कधी लागतेय हा प्रश्न परवलीचा बनलेला असतो. ज्या महिला आई होऊ शकत नाहीत, किंवा त्यांच्या आई होण्यात काही अडथळे येत असतील त्यांना आजही समाजाकडूनच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांकडूनही टोमणे ऐकून घ्यावे लागतात. याच संवेदनशील विषयावर कुर्रर्र नाटक हलकंफुलकं भाष्य करतं.