अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) 'धर्मवीर' सिनेमात आनंद दिघेंची भूमिका यशस्वीपणे पेलली. सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. तसंच विविध पुरस्कारांनी चित्रपटाला गौरवण्यात आलं. धर्मवीर साठी प्रसाद ओकलाही अनेक अवॉर्ड मिळाले. आता पुरस्कारांसाठी प्रसादने नवीनच घर घेतलंय की काय असा प्रश्नच त्याला फिल्मफेअरच्या मंचावर विचारण्यात आला. यावर प्रसादने स्वत:च खुलासा केला आहे.
काल मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी संपूर्ण मराठी सिनेसृष्टी एकत्र आली होती. तर प्रसाद ओकला 'धर्मवीर' सिनेमातील भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अभिनेत्री अश्विनी भावे (Ashwini Bhave) यांनी प्रसादला हा पुरस्कार प्रदान केला. दरम्यान प्रसाद स्टेजवर येताच निवेदकाने विचारले,'प्रसाद तुला या सिनेमासाछी जे काही पुरस्कार मिळाले आहेत ते ठेवण्यासाठी तू नवीन घर घेतलं आहे, हे खरं आहे का?' यावर प्रसाद म्हणाला, 'तथास्तू...तुझी इच्छा लवकरच पूर्ण होवो.'
प्रसादने पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करत एक पोस्टही शेअर केली आहे. त्याने लिहिले, 'अजून एक BLACK LADY घरात...!!!ती पण अशा LADY च्या हातून जिचा मी लहानपणापासून चाहता आहे. THE GORGEOUS अश्विनी भावे. पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार टीम धर्मवीर आणि अर्थातच प्रविण तरडे...!!!
'धर्मवीर' सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर धर्मवीर २ ची घोषणाही झाली आहे. प्रसाद लवकरच 'धर्मवीर २' मध्ये दिसणार आहे. धर्मवीरनंतर प्रसादने 'चंद्रमुखी' या सिनेमाचे दिग्दर्शन केले. हा सिनेमा देखील तुफान गाजला. सध्या मराठी सिनेसृष्टीत प्रसाद ओकची गाडी सुसाट आहे.