Join us

Dharmaveer 2 : 'त्यापेक्षा मालगाडी दाखवायची'? टीझरमधील ती चूक नेटकऱ्यांनी पकडली, व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 2:25 PM

सोशल मीडियावर या टीझरची चर्चा रंगली आहे. टीझरमधली एक चूकही नेटकऱ्यांनी पकडली आहे.

मराठीतील बहुचर्चित व बहुप्रतीक्षित चित्रपट म्हणजे 'धर्मवीर २'. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून मराठी रसिक प्रेक्षकांना कधी एकदा चित्रपट प्रदर्शित होतोय, असं झालं आहे. नुकतंच 'धर्मवीर २' सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये पुन्हा एकदा आनंद दिघे यांचा दरारा पाहायला मिळतोय. टीझरला चाहत्यांची मोठी पसंती मिळाल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर या टीझरची चर्चा रंगली आहे. या टीझरमधली एक चूकही नेटकऱ्यांनी पकडली आहे.

'धर्मवीर २'च्या नुकतंच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून पुन्हा एकदा प्रसाद ओकने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या टीझरमध्ये त्याचा तोच करारी बाणा आणि भेदक नजर अनुभवायला मिळत आहे.  पण, यात नेमकी एक चूक झाली असून ती चूक नेटकऱ्यांनी पकडली आहे. ती चूक म्हणजे चित्रपटात दाखवण्यात आलेली लोकल ट्रेन. 

टीझरमध्ये एक सीन असा आहे की, एका मुस्लिम महिलेच्या चेहऱ्यावरील जखमा पाहून संतापलेले आनंद दिघे हे महिला कार्यकर्त्यांसोबत रेल्वे ट्रॅकच्या बाजूनं चालताना दिसत आहेत. याचवेळी त्याच्यापाठीमागे एक बॉम्बार्डियर ट्रेन वेगात जाताना दिसतेय. इथेच नेमकी चूक झाली आहे.  मुंबईत बॉम्बार्डियर ट्रेन या २०१३ नंतर सुरू झाल्या आहेत. त्यापूर्वी मुंबईत जुन्या डीसी लोकल धावत होत्या. टीझरमध्ये मात्र आताची लोकल ट्रेन धावताना दिसतेय. 

सिनेमात २००१ पूर्वीचा काळ दाखवण्यात आलाय. मग बॉम्बार्डियर ट्रेन कशी काय दाखवली,  ही गोष्ट नेटकऱ्यांनी टीझरमधून हेरली. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. आनंद दिघे यांच्या काळात या बॉम्बार्डियर लोकल आल्या कुठून असा प्रश्न नेटकरी विचारताना दिसतायत. एका युजरनं लिहलं, 'दिघे साहेबांच्या काळात ही लोकल नव्हती, जी बॅकग्राऊंडमध्ये दाखिवली. त्या ऐवजी मालगाडी जाताना दाखिवली तर बरे झाले. ते VFX ने सहज शक्य होते. कारण आजकाल बाहेर गावी जाणार्‍या मेल/एक्सप्रेस गाड्या पण नवीन LHB आहेत. जुन्या ICF नाहीत त्यामुळे ते VFX ने कदाचित शक्य होणार नाही'.

यावरून प्रेक्षक किती बारकाईने कलाकृतीकडे बघतात हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. दरम्यान, आनंद दिघे यांच्या भूमिकेत पुन्हा एकदा अभिनेता प्रसाद ओक दिसणार आहे. या सिनेमातून आनंद दिघे यांनी केलेली कामं आणि त्यांच्या मृत्यूचं गूढ या चित्रपटातून उलगडणार आहे. ९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रवीण तरडेंनी केलं आहे. तर मंगेश देसाईंनी सिनेमाची निर्मिती केली आहे.

टॅग्स :प्रसाद ओक सेलिब्रिटीमराठी अभिनेतामराठी चित्रपटएकनाथ शिंदेसोशल मीडिया