Join us

‘रोल…कॅमेरा…ऍक्शन’ साठी ‘चंद्रमुखी’ होणार सज्ज, प्रसाद ओक करणार दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 4:56 PM

'चंद्रमुखी’सिनेमासाठी प्रसाद ओकचे दिग्दर्शन, चिन्मय मांडलेकरची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी,  निलेश वाघ यांचं कला दिग्दर्शन पाहायला, अनुभवयाला मिळणार आहे आणि ब-याच वर्षांनी अजय-अतुल यांचं अस्सल मातीतलं संगीत ऐकण्याची संधी देखील मिळणार आहे.

महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाला त्या दरम्यान प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी  पियूष सिंह यांनी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘एबी आणि सीडी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला आणि आता जागतिक महामारीच्या परिस्थितीत योग्य ती काळजी घेऊन त्यांनी ‘चंद्रमुखी’ या त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात करण्याचे ठरवले आहे. अक्षय बर्दापूरकर हे सलग तिसऱ्यांदा पियूष सिंह यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती करत आहेत. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट येत्या नोव्हेंबर महिन्यात ऑन फ्लोअर जाणार आहे. या जागतिक महामारीच्या प्रसंगातून सावरत पुढे येणारे हे पहिले मराठी बॅनर असेल.

चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार या बद्दल बोलताना दिग्दर्शक प्रसाद ओकने सांगितले की, "दिग्दर्शक म्हणून माझा पुढील चित्रपट 'चंद्रमुखी' येत्या नोव्हेंबरला ऑन फ्लोर जातोय, अर्थात सर्व प्रकारची योग्य काळजी घेऊनच शूटिंग केले जाईल. ब-याच दिवसांनी चित्रपटाच्या सेटवर जातोय, नवीन कामाची सुरुवात होतेय, याचा आनंद आहेच, पण त्याचसोबत जबाबदारी देखील आहे. जानेवारीमध्ये 'चंद्रमुखी'चं पोस्टर तुम्ही पाहिलंत, त्याला खूप प्रेम दिलंत... आता तुम्हांला जाणून घ्यायचं असेल की "चंद्रमुखी" च्या भूमिकेत नक्की कोणती अभिनेत्री आहे आणि इतर कलाकार सुद्धा कोण आहेत...या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याची आणि माझी नवीन कलाकृती लवकरात लवकर तुमच्या समोर आणण्याची माझी देखील इच्छा आहे...!!! नेहमीप्रमाणे तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी असुद्या...!!! लवकरच शूटिंगचा श्रीगणेशा होणार आहे...!!! गणपती बाप्पा मोरया...!!!"

अक्षय बर्दापूरकर यांच्यासाठी हा केवळ एक चित्रपट नसून हा ‘लार्जर दॅन लाईफ प्रोजेक्ट’ आहे आणि यावर टिप्पणी करताना त्यांनी म्हटले की, “विषयाच्या कथेसह प्रेक्षकांना एक सुंदर अनुभव देणारा चित्रपट म्हणून ‘चंद्रमुखी’ हे उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटाची कथा एका स्त्री भोवती फिरते जी समाजात चालणा-या अपारंपारिक मार्गावर  स्वत:च्या वास्तवतेचा शोध घेते. चित्रपटाची कथा सांगण्यास आम्ही उत्साही आहोत, पण त्याच वेळी विश्वास पाटील यांची बेस्टसेलरची सत्यता टिकवून ठेवण्याची देखील मोठी जबाबदारी आहे. मराठी चित्रपटसृष्टीला आणखी उंचीवर नेण्याचे आश्वासन या चित्रपटाने दिले आहे. प्रसाद ओकचे  दिग्दर्शन, चिन्मय मांडलेकरची पटकथा, संजय मेमाणे यांची सिनेमॅटोग्राफी,  निलेश वाघ यांचं कला दिग्दर्शन पाहायला, अनुभवयाला मिळणार आहे आणि ब-याच वर्षांनी अजय-अतुल यांचं अस्सल मातीतलं संगीत ऐकण्याची संधी देखील मिळणार आहे. 

टॅग्स :प्रसाद ओक