छोटा पडदा, रुपेरी पडदा आणि रंगभूमी गाजवणारा अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. आपल्या अभिनयाने चिन्मयने ही तिन्ही माध्यमं गाजवली आहेत. आज त्याचा वाढदिवस असून त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या लाडक्या मित्राने म्हणजेच प्रसाद ओकने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
चिन्मय मांडलेकर आणि प्रसाद ओक यांची मैत्री गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. आज चिन्मयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रसादने चिन्मय आणि त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्याचसोबत लिहिले आहे की, तुझ्यातल्या "लेखकाला, दिग्दर्शकाला, कवीला, निर्मात्याला, अभिनेत्याला, आणि याउपर तुझ्यातल्या "सच्च्या मित्राला" वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा...!!! "कच्चा लिंबू", "हिरकणी" नंतर या वर्षी "चंद्रमुखी" नी आपली hattrick होणार... तुला 1000 वर्षांचं आयुष्य लाभो... त्यात तुला हजारो चित्रपट लिहायला मिळो...आणि त्या सगळ्याचं दिग्दर्शन मलाच मिळो... हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!!!!!
प्रसादने कच्चा लिंबू, हिरकणी या चित्रपटांचे दिग्ददर्शन केले होते तर या चित्रपटांचे लेखन हे चिन्मयचे होते. या दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. कच्चा लिंबू या चित्रपटाला तर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यामुळे चंद्रमुखी हा चित्रपट देखील तितकाच ताकदीचा असणार आणि या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळणार असे म्हणायला काहीच हरकत नाही.
प्रसादच्या या पोस्टवर चिन्मय आणि प्रसादचे चाहते भरभरून कमेंट करत आहेत आणि चिन्मयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. चिन्मयने एक अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक लेखक, दिग्दर्शक, कवी, निर्माता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याला गेल्या काही वर्षांत प्रचंड लोकप्रियता मिळाली असून त्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे.