शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावरील ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) सिनेमा जोरदार हिट झाल्यानंतर अभिनेता प्रसाद ओक आता नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. सिनेक्षेत्रात इतकी वर्ष काम केल्यानंतर 'धर्मवीर'च्या माध्यमातून पहिल्यांदाच मुख्य भूमिका असलेलं पत्रा साकारायला मिळाल्याचं प्रसाद ओकनं सांगितलं होतं. 'धर्मवीर'च्या यशानंतर आता नव्या वर्षात प्रसाद ओक दिवंगत दिग्गज नाट्यकलावंत प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
प्रसाद ओक यानं नुकतंच त्याच्या सोशल मीडिया हँडल्सवरुन याची घोषणा केली आहे. प्रसादनं त्याच्या नव्या प्रोजेक्टची माहिती देणारं एक पोस्टर जाहीर केलं आहे. प्रभाकर पणशीकर म्हणजेच 'पंत' हे मराठी रंगभूमीवरील अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते होते. आता प्रभाकर पणशीकर यांच्या आयुष्यावरील चित्रपटात प्रसाद ओक मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
"नवं वर्ष...नवं स्वप्न...सोबत जुनेच मित्र कलावंत...आणि आशीर्वाद देणारे आहेत 'पंत" अशा कॅप्शनसह प्रसाद ओक यानं यंदाच्या वर्षातील सर्वात मोठं गिफ्ट प्रेक्षकांना दिलं आहे. प्रभाकर पणशीकर यांच्या आयुष्यावरील सिनेमाचं नाव "तोच मी...प्रभाकर पणशीकर" असं असणार आहे. दिग्दर्शक अभिजीत शिरीष देशपांडे यांच्यावर सिनेमाच्या दिग्दर्शनासोबत लेखनाची जबाबदीर असणार आहे.
याआधी अभिनेता सुबोध भावे रंगभूमीवरील दिग्गद कलावंत डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेत दिसला होता. या पर्वाचाही उल्लेख प्रसादने पोस्ट केलेल्या पोस्टरमध्ये करण्यात आला आहे. "आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर' नंतर मराठी रंगभूमीवरील सोनेरी इतिहासातलं पुढचं पर्व" असं म्हणत प्रभाकर पणशीकर यांच्या आयुष्यावरील सिनेमाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
प्रसाद ओकनं 'धर्मवीर'मध्ये साकारलेल्या आनंद दिघेंच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. चित्रपटाच्या यशानंतर आता 'धर्मवीर'च्या दुसऱ्या भागाचीही घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या किंवा २०२४ मध्ये धर्मवीरचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. यासोबतच नववर्षाची सुरुवात प्रसादनं प्रभाकर पणशीकर यांच्यावरील चित्रपटाची माहिती देत गोड केली आहे. आता चाहत्यांना प्रसादच्या लूकची उत्सुकता लागून राहिली आहे.