एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सफल झालं याचं परिमाण सांगताना आपण नेहमी 'मरावे परंतु कीर्ती रुपी उरावे' या उक्तीचा वापर करतो. आपण हयात नसतानाही किर्तीरूपांत लोकांच्या स्मरणात राहणे, त्यांच्या आठवणीत जिवंत राहणे यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते. असं जगणं फार कमी लोकांच्या वाट्याला येतं.अशा जगण्याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणजे धर्मवीर आनंद दिघे (anand dighe). समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या आनंद दिघे यांच्या जीवनावर चित्रपट आला आहे. त्यामुळेच या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. सिनेमाला रिलीजनंतरही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद थिएटरमध्येही मिळतोय.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (dharmaveer)या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत आहे. यात चित्रपटातील अभिनेता प्रसाद ओकच्या (prasad oak) लूकपासून ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होती. त्यामुळे या चित्रपटाला मिळत असलेलं प्रेम पाहून प्रत्येक जण भारावून गेला आहे. 13 मे रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' सिनेमा 400 हून अधिक स्क्रिन्स आणि 10 हजाराहून अधिक मोठ्या पडद्यांवर झळकताना पाहायला मिळत आहे. सिनेमात आनंद दिघेंच्या व्यक्तिरेखेला प्रसाद ओकशिवाय अन्य कोणताही अभिनेता न्याय देऊ शकला नसता. खरे वाटावेत असे दिघे प्रसादने सादर केले आहेत.