प्रसाद ओक हा मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये काम करून त्याने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रसादने मोठ्या कष्टाने आणि टॅलेंटच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत जम बसवला. आता नावारुपाला आलेल्या प्रसादने मात्र आयुष्यात अनेक समस्यांना तोंड दिलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने कठीण काळाबद्दल भाष्य केलं आहे.
प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या आणि सध्या सिनेमा आणि त्यातील भूमिकांमुळे चर्चेत असलेल्या प्रसादकडे मात्र एकेकाळी काहीच काम नव्हतं. जवळपास एक-दीड वर्ष तो काम मिळवण्यासाठी धडपड करत होता. या काळात पत्नी मंजिरीने त्याला साथ दिली आणि त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली. आरपार या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत प्रसादने त्याच्या आयुष्यातील या काळाबद्दल भाष्य केलं. राजा गोसावी यांच्या निधनानंतर भ्रमाचा भोपळा नाटक बंद पडलं आणि त्यानंतर प्रसादचा कठीण काळ सुरू झाला.
प्रसाद म्हणाला, "राजाभाऊ गेले आणि धुवांधार सुरू असलेलं नाटक ठापकन बंद पडलं. त्याच्यानंतर जवळपास वर्ष-सव्वा वर्ष माझ्याकडे कामच नव्हतं. एकही नाटक नाही, एकही मालिका नाही...चित्रपट तर तेव्हा माझ्या स्वप्नात पण नव्हते. तेव्हा मंजूने एका मॅगझीनमध्ये नोकरी केली. जेव्हा मी एशियाडने पहिल्यांदा तिला मुंबईहून दादरला आणलं. आणि दादरवरुन लोकलने बोरीवलीला नेलं. तेव्हा त्या लोकलमधून उतरल्यानंतर तिने विचारलं की आता ही ट्रेन पुण्याला जाते का...असा जिचा मुंबईतील प्रवास सुरू झाला. ती कांदिवली ते कोपरखैरणे...असा २-३ ट्रेन्स बदलत प्रवास करून तिने नोकरी केली. आणि तेव्हा ती गरोदर होती".
"असे दिवस आम्ही काढले आहेत. पण, ते काढलेत म्हणूनच आजचा दिवस आम्ही आनंदात बघतोय", असंही प्रसाद पुढे म्हणाला. अभिनेत्याबरोबरच प्रसाद एक उत्तम दिग्दर्शकही आहे. हिरकणी, कच्चा लिंबू, चंद्रमुखी असे सिनेमे त्याने दिग्दर्शित केले आहेत.