मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याच्यासाठी हे वर्ष सर्वार्थाने यशस्वी ठरलं. या वर्षात त्याचा ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer- Mukkam Post Thane) हा सिनेमा तुफान गाजला. शिवाय याच वर्षात प्रसादने दिग्दर्शित केलेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटालाही प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ या प्रसादच्या सिनेमाची इतक्या महिन्यानंतरही क्रेझ कायम आहे. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमातील प्रसादच्या लुकची, त्याच्या अप्रतिम अभिनयाची आणि चित्रपटातील त्याच्या संवादांची चर्चा आजही होताना दिसते. प्रसादचा हा सिनेमा रिलीज झाला आणि याचदरम्यान महाराष्ट्रात सत्तांतर झालं. साहजिकच ‘धर्मवीर-मुक्काम पोस्ट ठाणे’ आणि महाराष्ट्रातील सत्तांतर यांचा परस्पर संबंध होता का? असा प्रश्न अनेकांना पडला. आता यावर खुद्द प्रसादने उत्तर दिलं आहे.
‘न्यूज 18 लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद यावर बोलला. ‘धर्मवीर’ प्रदर्शित होणं आणि त्यानंतर झालेला सत्तापालट याचा खरोखर काही संबंध आहे का? असा प्रश्न प्रसादला यावेळी विचारण्यात आला. यावर प्रसाद ओक म्हणाला, ‘खरोखर आणि एक सच्चा कलाकार म्हणून प्रामाणिकपणे सांगायचं तर मला याच्याबद्दल काहीही माहिती नाही. महाराष्ट्रात सत्तापालट होणार होता की नाही? आणि तो धर्मवीरमुळे झाला की नाही? यावर चर्चा सुरू आहे. पण व्यक्तिश: मला याबद्दल काहीही माहिती नाही. धर्मवीर चित्रपटाने अचूक वेळ साधली, असा आरोप होण्याचं काही कारण नाही. मी कलाकार म्हणून हा चित्रपट स्विकारला होता. अशी कलाकृती साकारायची संधी वारंवार मिळत नाही. धर्मवीर सारखे चित्रपट वारंवार बनत नाही. अशी भूमिका सतत वाट्याला येत नाही, हीच माझी भावना होती. समोरुन माझ्याकडे आनंद दिघेंची भूमिका येत असेल तर ती जीव तोडून साकारायला हवी, त्यांच्या भावनांचा आदर राखला जावा, इतकाच मी विचार केला’.