मराठी मनोरंजन विश्वात ‘रंगभूमीचा बादशहा’ असं बिरूद मिरवणारं नाव म्हणजे प्रशांत दामले. आपल्या दमदार अभिनयानेच नव्हे, तर मधुर आवाजानेही प्रशांत दामले यांनी प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच गारुड घातले. प्रशांत दामले मंचावर आले की, एक वेगळेच वलय निर्माण होते अन् उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन जातात. नाटकाच्या मंचावर तर अक्षरशः ते जादूगारच वाटतात. नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना ही जादू प्रत्यक्ष अनुभवता येते. तर, प्रेक्षकांना आपल्या आवडत्या अभिनेत्याकडून आपले हट्ट देखील पुरवून घेता येतात. असाच प्रसंग नुकताच ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या दरम्यान घडला आहे.
प्रशांत दामले यांच्या ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाचा प्रयोग नुकताच दिनानाथ नाट्यगृहात पार पडला. यावेळी नाटक बघायला आलेल्या प्रेक्षकांनी प्रशांत दामले यांना त्यांच्या आवाजात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाणं गाण्याची विनंती केली. प्रेक्षकांचा हा आग्रह प्रशांत दामलेंनाही मोडता आला नाही आणि त्यांनी गाणं गाण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे यावेळी प्रेक्षकांनी देखील त्यांना साथ दिली. प्रेक्षकांनी देखील प्रशांत दामले यांच्यासोबत गाणं गात नाट्यगृहाचा माहोल बदलून टाकला.
प्रशांत दामलेंनी शेअर केला व्हिडीओया खास प्रसंगाचा व्हिडीओ स्वतः प्रशांत दामले यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. नाट्यगृहातील व्हिडीओ शेअर करताना प्रशांत दामले म्हणाले की, ‘काल सोमवार दि. २१ एप्रिल, दुपारी दिनानाथ नाट्यगृहात ‘शिकायला गेलो एक’ ह्या नाटकाचा हाऊसफ़ुल्ल प्रयोग झाला. पण, त्यानंतर रसिकांनी मला प्रेमळ आग्रह केला की, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ मधले ‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’ हे गाण गा. मी गायलो, पण सर्वांनी एकत्र गायलं.. काही प्रत्यक्ष गात होते, काही मनातल्या मनात गात होते... आणि सर्वात महत्वाचे..... सगळे आनंदी आणि खुश होते... हॅट्स ऑफ़ टु संगीतकार अशोकजी पत्की आणि कवी श्रीरंग गोडबोले. केवढ गारुड आहे ह्या गाण्याचं!’
अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या चार दशकांपासून मराठी मनोरंजन विश्व गाजवत आहेत. टीव्ही असो वा चित्रपट, नाटक, त्यांचा उत्साह आणि उर्जा नेहमीच प्रेक्षकांना भारावून टाकते. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केली आहे. त्यांच्या मधुर आवाजाने देखील प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या मनाला भुरळ घातली आहे.