हिंदी सिनेइंडस्ट्रीत स्थिरस्थावर होऊ पाहणारी अर्मेनियन डान्सर एलेना दुर्गारियनची पावलंही मराठीच्या दिशेनं वळली आहेत. पदार्पणातच तिनं 'एक नंबर' धमाल नाचो साँगवर परफॅार्म करत तमाम रसिकांना घायाळ करण्याची योजना आखली आहे. मिलिंद कवडे (Milind Kavde) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'एक नंबर...सुपर' या आगामी मराठी चित्रपटात प्रथमेश परब (Prathmesh Parab)सोबत एलेनाचा धमाल डान्स परफॅार्मंस पहायला मिळणार आहे.
या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार असून, एलेनासोबत नाचतानाही दिसणार आहे. 'एक नंबर...सुपर' या चित्रपटातील 'माझे तुकडे तुकडे व्हतील गं...' असा मुखडा असलेल्या गाण्यावर एलेना आणि प्रथमेशचे धडाकेबाज परफॅार्मंस प्रेक्षकांना पहायला मिळणार असून राहुल संजीर यांनी कोरिओग्राफी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं एलेनानं प्रथमच मराठी चित्रपटात काम केलं आहे. दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी एलेनाला मराठीत आणण्याची किमया साधली आहे.
एलेना-प्रथमेशवर शूट करण्यात आलेलं गाणं गीतकार जय अत्रे यांनी लिहिलं असून, वरुण लिखते, मुग्धा कऱ्हाडे आणि कविता राम यांनी गायलं आहे. वरुण यांनीच हे गाणं संगीतबद्धही केलं आहे. एलेना ही रशियातील प्रसिद्ध डान्सर आहे. परदेशासोबतच भारतातही तिचे खूप चाहते आहेत. जबरदस्त लुक, आकर्षक डान्स, लक्षवेधी देहबोली, गोड स्मित, हॉट व्यक्तिमत्व आणि अनोख्या नृत्यशैलीसाठी एलेना यु ट्यूबवर खूप पॅाप्युलर आहे. 'एक नंबर...सुपर' चित्रपटातील गाण्यात प्रथमेशसोबत तिच्या डान्सचा जलवा प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. 'एक नंबर...सुपर' मधील 'बाबूराव झाला...' हे गाणं यापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, आता 'माझे तुकडे तुकडे व्हतील गं...' हे गाणं धमाल करण्यासाठी सज्ज झालं आहे. या गाण्यासाठी एलेनाची निवड करण्याबाबत मिलिंद कवडे म्हणाले की, मला नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन द्यायला आवडतं. 'माझे तुकडे तुकडे व्हतील गं...' या गाण्यासाठी एलेनाची निवडही याच विचारातून करण्यात आली आहे. या निमित्तानं आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या एका पॅाप्युलर डान्सरची मराठी सिनेसृष्टीत एंट्री झाली आहे. वरुण यांनी लिहिलेलं गाणं खूप सुंदर असून, त्यावर बांधलेली चाल त्याही पेक्षा सुरेख असून अबालवृद्धांना थिरकायला लावणारी आहे. नेहमीप्रमाणे 'एक नंबर...सुपर'च्या माध्यमातून प्रेक्षकांचं परिपूर्ण मनोरंजन करण्याचा प्रयत्न केला आहे, जो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची खात्री आहे.