दगडू या नावाने प्रत्येक घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे प्रथमेश परब (prathamesh parab). 'टाईमपास' (timepass) या चित्रपटाने प्रथमेशला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली. त्यामुळेच आज मराठी कलाविश्वात त्याच्या नावाची चर्चा रंगत असते. सध्या प्रथमेश लागोपाठ एका मागून एक चित्रपटामध्ये झळकत आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये चर्चा होत आहे. परंतु, सध्या प्रथमेश एका वेगळ्या कारणामुळेही चर्चेत येत आहे. मध्यंतरी प्रथमेश दिल्लीतील रेडलाइट एरियात गेल्याचं समोर आलं आहे.
उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारा प्रथमेश अलिकडेच दिल्लीतील रेड लाइट एरियात गेला होता. याविषयीचा खुलासा त्याने स्वत:चं केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली. मात्र, प्रथमेश अन्य या चित्रपटासाठी या भागात गेल्याचं समोर आलं आहे.काही दिवसांपूर्वीच प्रथमेशचा 'अन्य' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात पहिल्यांदाच प्रथमेश रावडी लूकमध्ये पाहायला मिळाला. वास्तववादी घटनांवर आधारलेल्या 'अन्य' या चित्रपटामध्ये समाज विघातक रॅकेटचा पर्दाफाश करण्याची कथा दाखवण्यात आली आहे. यात हेरगिरी करण्याची जबाबदारी प्रथमेशकडे सोपवण्यात आल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे चित्रपटातील हे कॅरेक्टर रिअल वाटावं यासाठी प्रथमेशनं चक्क दिल्लीतील रेड लाइट एरियात जाऊन पाहणी केली.
कोणतीही भूमिका एकरूप होऊन केली की ती प्रेक्षकांपर्यंत अगदी सहजपणे पोहोचते, असं प्रथमेशचं मत आहे. त्यामुळे त्याने रेड लाइट एरियात पाय ठेवला आणि तेथील परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, दक्षिणात्य दिग्दर्शक सिम्मी जोसेफ यांनी 'अन्य'चं दिग्दर्शन केलं असून, लेखनही त्यांचंच आहे. या चित्रपटात प्रथमेशसोबत रायमा सेन, अतुल कुलकर्णी, तेजश्री प्रधान, भूषण प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे, यशपाल शर्मा आणि गोविंद नामदेव या कलाकारांनी स्क्रीन शेअर केली आहे.