हल्लीच 'ढिशक्यांव' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि तेव्हापासून या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधत प्रथमेश परब अभिनित 'ढिशक्यांव' या चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे, प्रेक्षकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम देत चित्रपटाचा टिझर भेटीस आला आहे. चित्रपटाचा टिझर हा आणखीनच गोंधळात पाडणारा आहे कारण टिझरमध्ये पाहता प्रथमेश प्रेमापासून दूर राहायचे सल्ले देताना दिसतोय आता खरंच चित्रपटात प्रेमापासून दूर राहिलेला प्रथमेश पाहायला मिळणार की हे काही खास गुपित आहे याचा उलगडा १० फेब्रुवारी २०२३ ला होणार हे पाहणे रंजक ठरेल.
दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित 'ढिशक्यांव'' हा चित्रपट निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एसके पाटील यांनी निर्मित केला असून चित्रपटाची प्रस्तुती एव्हीके एंटरटेनमेंट (AVK Entertainment), अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांनी उत्तमरीत्या पेलली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून राजीव पाटील, राहुल जाधव आणि उमाकांत बरदापुरे यांनी बाजू सांभाळली आहे. प्रितम एस के पाटील यांनी दिग्दर्शक आणि निर्माता अशी दुहेरी भूमिका या चित्रपटासाठी साकारली आहे. चित्रपटाची कथा, संवाद, स्क्रीनप्ले लेखक संजय नवगिरे लिखित आहे. तर संपूर्ण चित्रपट योगेश कोळी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे, संकलक सौमित्र धरसुरकर याने चित्रपटाच्या संकलनाची बाजू उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटात साऊंडची जबाबदारी स्वरूप जोशी याने अचूक सांभाळली आहे. तर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून संतोष खरात यांनी बाजू सांभाळली. चित्रपटात कॉस्च्युमची जबाबदारी अपेक्षा गांधी सोनी, मेकअपची जबाबदारी कुमार मगरे यांनी पेलवली. तर प्रथमेश परब सोबत या चित्रपटात संदीप पाठक, अहेमद देशमुख, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे या कलाकारांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
'ढिशक्यांव' चित्रपटाचा टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे, कारण गोंधळात पाडणाऱ्या या टिझरने ही उत्सुकता ताणली आहे, आता जास्त विलंब न करता येत्या १० फेब्रुवारी २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.