अरे हम गरीब हूए तो क्या हुआ, दिल से अमीर है... अमीर... हा डायलॉग आठवताच आठवतो तो ‘टाईमपास’मधला दगडू. हाच दगडू आता मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांचा लाडका अभिनेता झाला आहे. आम्ही बोलतोय तो दगडूची भूमिका साकारणाऱ्या प्रथमेश परबबद्दल (Prathamesh Parab). दगडूला लोकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं. त्याच्यासोबतच प्राजूने ही प्रेक्षकांच्या मनावर आपल्या भूमिकेचा ठसा उमटवला आहे. आता दगडूच्या रिअल लाईफमध्ये ‘प्राजू’ची एन्ट्री झालीये. होय, आज व्हॅलेन्टाईन डेचं मुहूर्त साधत खुद्द प्रथमेशने जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.
प्रथमेशने गर्लफ्रेंड क्षितिजा क्षितिजा घोसाळकरबरोबरचा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. “ती म्हणते हे करू मी म्हणतो ओके.. आणि हे असंच सुरू राहू दे”, असं या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं म्हटलं आहे. इट्स ऑफिशिअल असा हॅशटॅग देत, त्याने क्षितिजासोबतचं नातं अधिकृत केलं आहे. क्षितिजानेही एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने प्रथमेशचा पहिला मॅसेज, पहिली भेट आणि त्यानंतरचे अनेक रोमॅन्टिक क्षण दाखवले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून प्रथमेश व क्षितिजा एकमेकांना डेट करत आहेत.
दीर्घकाळापासून प्रथमेश व क्षितिजाच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. प्रथमेशने क्षितिजासोबत दिवाळी साजरी करतानाचे दोघांचे काही सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चेला उधाण आलं होतं.
टाइमपास’ या चित्रपटामुळे अभिनेता प्रथमेश परब प्रसिद्धीच्या झोतात आला. या चित्रपटामध्ये त्याने साकारलेला दगडू आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर प्रथमेशने अनेक हीट चित्रपटांमध्ये काम केलं. बालक-पालक, टाईमपास, टाईमपास 2, लालबागची राणी, उर्फी अशा अनेक सुपरहीट चित्रपटांमध्ये तो दिसला. या सिनेमांमुळे तो आता स्टार झाला आहे. ‘बालक-पालक’ या सिनेमातून त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. कुटुंबात अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना प्रथमेशनं आज उत्तम अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली आहे. मराठीसोबतच दृश्यम, दृश्यम २, खजूर पे अटके आणि अन्य या हिंदी चित्रपटांमध्येही तो झळकला आहे.