‘टकाटक 2’ (Takatak 2 ) हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. सुबोध भावेच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमधील बोल्ड सीन्सनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आणि चित्रपटाची चर्चा सुरू झाली. उद्या 18 ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमेश परब, भूमिका कदम आणि सुशांत दिवेकर यांनी ‘लोकमत फिल्मी’ला ‘टकाटक’ मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘टकाटक 2’च्या कथेपासून ट्रोलिंगपर्यंत चौफेर गप्पा रंगल्या...
टकाटक 2 असं नाव का?टकाटक हिट झाला म्हणून ‘टकाटक 2’ करायचा असं काही डोक्यात नव्हतं. सरांनी एक कथा लिहिली. आधीची सगळी पात्र या कथेला सेम जातायेत, असं त्यांना वाटलं आणि ‘टकाटक 2’चं काम सुरू झालं. या चित्रपटात अनेक जुनी कॅरक्टर्स आहेत. तशीच अनेक नवीन कॅरक्टर्स पण आहेत. ‘टकाटक ’ जिथे संपला होता, तिकडून काही नवीन करणं शक्य नव्हतं. त्यामुळे काहीतरी वेगळं करू. फक्त नावं सेम ठेऊ असं ठरलं. ‘टकाटक 2’ची स्टोरी जरी वेगळी असली तरी कॅरेक्टरमुळे लोकांना ही कथा आवडेल, असं प्रथमेश म्हणाला.
डिजिटली ट्रेलर जरी अॅडल्ट वाटत असला तरी...डिजिटली ट्रेलर जरी अॅडल्ट वाटत असला तरी सिनेमा आम्ही फॅमिली ऑडिअन्स पण यावा या हेतूने बनवला आहे. युथची मज्जा कमी होणार नाही, हा सुद्धा आमचा प्रयत्न आहे, असं प्रथमेश म्हणाला. अॅडल्ट कॉमेडी जॉनरचे सिनेमे चालतील का? असा प्रश्न लोकांनी आधी उपस्थित केला होता. पण ‘टकाटक’ने ब-याच गोष्टी बदलल्या. ‘टकाटक 2’च्या ट्रेलरखाली ज्या निगेटीव्ह कमेंट्स येत आहेत, त्यांनाच लोक पॉझिटीव्ह कमेंट्स देत आहेत, असंही तो म्हणाला.