Join us

'डिलिव्हरी बॉय'मधील 'तू आई होणार' गाणं प्रदर्शित, काही तासांतच हजारो व्ह्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 5:48 PM

बहुप्रतिक्षीत 'डिलिव्हरी बॉय' सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. आता या सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत असलेल्या 'डिलिव्हरी बॉय' या सिनेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सरोगसीसारखा विषय या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे. प्रथमेशबरोबर महाराष्ट्राची हास्यजत्रामधून घराघरात पोहोचलेला अभिनेता पृथ्विक प्रतापही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. बहुप्रतिक्षीत 'डिलिव्हरी बॉय' सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. आता या सिनेमातील नवं गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

'डिलिव्हरी बॉय' या सिनेमातील 'तू आई होणार' हे डोहाळ जेवणावरील नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील आणि आठ गर्भवती महिलांवर चित्रित करण्यात आलेले हे गाणे अतिशय कलरफुल आहे. सुमधूर गायिका आर्या आंबेकरने हे गाणं गायलं आहे. तर या गाण्याला प्रशांत मदपुवार यांचे अर्थपूर्ण बोल आणि चिनार-महेश यांचे संगीत लाभले आहे. डोहाळे जेवण हा प्रत्येक गर्भवतीसाठी स्वतःचे लाड पुरवून घेण्याचा दिवस असतो. या आठ गरोदर बायकांचा कौतुक सोहळा आणि सेलिब्रेशन करणारे हे गाणे आहे. आईपणाची हळवी भावना या गाण्यातून व्यक्त होत आहे. गाण्याबद्दल दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, "डोहाळेजेवण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. यानिमित्ताने स्त्रिया आपले कोडकौतुक पुरवून घेतात. या गाण्यातही तेच दाखवण्यात आले आहे. हे गाणे चित्रित करताना सगळ्यांनीच धमाल केली आहे. गाण्याचे बोल, संगीत, गायन ही खूपच सुंदर भट्टी जमून आली आहे."

मोहसीन खान यांनी 'डिलिव्हरी बॉय' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेपोलिस आणि दीपा नायक प्रस्तुत, लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर, विकास श्रीवास्तव, विकास सिंग, राझ धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी केले आहे. हा सिनेमा ९ फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :प्रथमेश परबपृथ्वीक प्रतापसिनेमा