Join us

Fatwa Marathi Movie Review : गावाकडल्या गुलाबी प्रेमाची ‘सैराट’ कथा, जाणून घ्या कसा आहे ‘फतवा’

By संजय घावरे | Published: December 11, 2022 4:45 PM

Fatwa Marathi Movie Review : धावण्यात चपळ असूनही परिस्थितीनं गरीब असल्यानं पायात बूटही नसलेल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या रवीची ही कहाणी आहे.

दर्जा : **1/5 (अडीच स्टार)कलाकार : प्रतिक गौतम, श्रद्धा भगत, छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, पूनम कांबळे, अमोल चौधरी, संजय खापरे, पूनम कांबळे, अमोल चौधरी, निलेश वैरागर, निखिल निकाळजे, निकिता संजयलेखक-दिग्दर्शक : प्रतिक गौतमनिर्माते : डॉ. यशवंत, प्रेमा निकाळजे, अनुराधा पवारशैली : लव्हस्टोरीकालावधी : 2 तास 20मिनिटे............................

Fatwa Marathi Movie Review : सिनेसृष्टीत नेहमीच एखादा चित्रपट हिट झाला की त्यासारखे बरेच चित्रपट पहायला मिळतात. या चित्रपटातही गावाकडच्या दोन जीवांच्या गुलाबी प्रेमाची कथा पहायला मिळते. नावीन्याचा अभाव, दिग्दर्शनातील कच्चे दुवे आणि काही कलाकारांचा चांगला अभिनय अशी काहीशी सरमिसळ या चित्रपटात पहायला मिळते. या निमित्ताने पुन्हा एकदा समाजातील विषमतेची वैचारीक दरी अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कथानक : धावण्यात चपळ असूनही परिस्थितीनं गरीब असल्यानं पायात बूटही नसलेल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या रवीची ही कहाणी आहे. रवीचे वडील मोलमजूरी करत करतात, तर आई गृहिणी आहे. त्याच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या श्रीमंत घरच्या नियाचा रवीवर जीव जडतो. रवीला मात्र आपल्या परिस्थितीची जाण असते. आपल्या सारख्या गरीबाला प्रेम परवडणारं नसल्याचं त्याला माहित असतं. त्यामुळेच तो नियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असतो, पण खरं प्रेम कधीच लपून राहू शकत नाही तसं रवी आणि निया यांच्या प्रेमाची कळी खुलते. नियाच्या घरी जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा काय घडतं ते या चित्रपटात आहे. 

लेखन-दिग्दर्शन : मुख्य भूमिकेतील प्रतिक गौतमनंच चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. गरीब मागासवर्गीय तरुण आणि उच्चवर्णीय श्रीमंत तरुणी या वनलाईनवर आजवर असंख्य चित्रपट बनले आहेत. पटकथेत नावीन्यपूर्ण घटना आणि ट्रॅक्सचा समावेश असणं अपेक्षित होतं. वास्तवदर्शी लोकेशन्स, कलाकारांचा गेटअप, गावातील वातावरण, कॉस्च्युम्स आदी गोष्टी चांगल्या झाल्या आहेत. यापूर्वी बऱ्याचदा पाहिलेलं, या चित्रपटात पहायला मिळतं. काही दृश्ये अतिरंजीत वाटतात, तर काहींमध्ये बऱ्याच उणीवा जाणवतात. नवोदित कलाकारांना ब्रेक देण्याच्या उद्देशानं कास्टिंग दिग्दर्शकानं केलेली निवड खऱ्या अर्थाने आश्चर्यचकीत करणारी आहे. आपणच दिग्दर्शक असल्यानं मुख्य भूमिकाही साकारण्याचा अट्टाहास प्रतिकनं करायला नको होता. काही दृश्यांचा आपसात मेळ बसवण्याची गरज होती. नायक स्वाभिमानी असला तरी स्वाभिमानी बाणा कुठेही दिसत नाही. सिनेमॅटोग्राफी, गीत-संगीत तसंच पार्श्वसंगीत सामान्य आहे. संकलनात कात्री चालवायला हवी होती.

अभिनय : प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी कोरी जोडी या चित्रपटात आहे. दोघांनीही आपल्या परीनं चांगला प्रयत्न केला असला तरी त्यांना अद्याप खूप शिकण्याची गरज आहे. मिलिंद शिंदे यांच्या रूपातील मजूरी करणारा सदू चांगला झाला आहे. राजकारण्याच्या रूपात नागेश भोसले यांनी छान रंग भरले आहेत. आईसाहेबांच्या भूमिकेत छाया कदम ओव्हर अ‍ॅक्टिंगला बळी पडल्याचं जाणवतात. संजय खापरेचा गोंधळ बरा झाला आहे. पूनम कांबळे, अमोल चौधरी, निलेश वैरागर, निखिल निकाळजे, निकिता संजय यांनी सहाय्यक व्यक्तिरेखांमध्ये साथ देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

सकारात्मक बाजू : अभिनय, गेटअप, वास्तवदर्शी लोकेशन्स, वातावरणनिर्मिती, कॉस्च्युम्सनकारात्मक बाजू : दिग्दर्शन, संकलन, सिनेमॅटोग्राफी, गीत-संगीत, पार्श्वसंगीतथोडक्यात : समाजातील विषमतेची दरी दर्शवणारी गावाकडची ही प्रेमकथा मोकळा वेळ असेल आणि मनोरंजनाचा पर्याय उपलब्ध नसेल तर पहायला हरकत नाही.

टॅग्स :मराठी चित्रपटमराठी अभिनेता