मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि उत्तम अभिनय कौशल्य असलेला अभिनेता म्हणजे प्रविण तरडे (pravin tarde). आजवर त्यांच्या प्रत्येक सिनेमातून त्यांनी समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दर्जेदार कलाकृतींसाठी ते कायमच चर्चेत असतात. परंतु, यावेळी ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. 'मराठीमध्ये जर मी हंबीरराव, प्रतापराव असेन तर हिंदीमध्ये फुटकळ भूमिका का करायच्या?', असा सवाल त्यांनी विचारला आहे.
अलिकडेच प्रविण तरडे यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. यामध्येच हिंदी सिनेमांमध्ये काम करताना आलेल्या अनुभवावर भाष्य केलं.
काय म्हणाले प्रविण तरडे?
'‘मराठी माणसाने आपण मनोरंजनसृष्टीचे मालक आहोत हे लक्षात ठेवायला हवं. कारण, दादासाहेब फाळके यांनी आपल्याला मोठा वारसा दिला आहे. मला बऱ्याचदा हिंदी सिनेमांमध्ये काम करण्याच्या ऑफर्स येतात. मात्र, मला नकार देण्यात जास्त मज्जा येते. कारण, तिकडे जाऊन मी कोणत्या भूमिका करु? मराठीमध्ये मी हंबीरराव असेन, मांजरेकरांच्या सिनेमात प्रतापराव असेन किंवा एस.एस. राजामौलींशी संबंधित लोकांसोबत काम करत असेन तर, हिंदीत फुटकळ भूमिका कशासाठी करायच्या?", असं प्रविण तरडे म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "साऊथमध्ये मी एक भन्नाट सिनेमा करतोय. त्याची लवकरच घोषणा होईल. तिथे चांगलं काम मिळाल्यामुळे मी एका पायावर तयार झालो. राजामौली माझे आदर्श आहेत. 'धर्मवीर’चं पोस्टर त्यांच्या हस्ते लाँच झालं होतं. "
दरम्यान, प्रविण तरडे हे मराठी सिनेसृष्टीतलं नावाजलेलं नाव आहे. एकांकिका, नाट्यस्पर्धा, नाट्यशिक्षक, लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता असा त्यांचा प्रवास आहे. प्रविण तरडे यांचे ‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ असे अनेक सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले आहेत.