Join us

"आपण माणसांशी बोलतो, पण माणसांबद्दल..." नितीन देसाईंच्या निधनानंतर प्रविण तरडे भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 10:14 AM

प्रविण तरडेंनी दोनच दिवसांपूर्वी नितीन देसाईंची भेट घेतली होती.

कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (Nitin Chandrakant Desai) यांच्या आत्महत्येने कलाविश्व हादरलं आहे. 'देवदास', 'लगान', 'जोधा अकबर' सारख्या कित्येक सिनेमांचं डोळे दिपवणारं कलादिग्दर्शन करणारे नितीन देसाई अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलतील याची कोणीही कल्पनाही केली नसेल. अतिभव्य आणि सुंदर सेट उभारण्यात त्यांचा हात धरणारं कोणीच नसेल. मराठी माणसाला अभिमान वाटेल आणि हिंदीलाही टक्कर देईल असा ND स्टुडिओची त्यांनी कर्जत येथे स्थापना केली. त्यांचं निधन हे चटका लावणारंच आहे. 

नितीन देसाई यांचे मित्र प्रविण तरडे (Pravin Tarde) भावना व्यक्त करताना म्हणाले, 'आता केवळ आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत. गेल्या २०-२१ वर्षांपासून मी त्यांना ओळखत होतो. अमोल पालेकर यांच्या एका सिनेमात मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होतो. तेव्हा कलादिग्दर्शक नक्की कसं काम करतो हे मी जवळून पाहिले होते.'

ते पुढे म्हणाले, 'मी दोनच दिवसांपूर्वी त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो. माझ्याच एका सिनेमाचं काम होतं. अतिशय हसतखेळत, एनर्जीने बोलणाऱ्या माणसाच्या मनात इतकी काही खळबळ असेल असं वाटलंही नाही. त्यांनी मला घर दाखवलं. नवीन आणलेल्या काही वस्तूही दाखवल्या. माझ्या सिनेमाबद्दल आम्ही बोललो. मी त्यांना पैसे कमी करण्सास सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, तुला जमतील तितके दे.आम्ही बरंच काही बोललो पण त्यांनी मनातलं काहीच सांगितलं नाही. मी त्यांच्याशी बोललो पण त्यांच्याबद्दल विचारायचं राहून गेलं. आपण माणसांशी बोलतो, माणसांबद्दल बोलायचं राहूनच जातं.' अशा शब्दात प्रविण तरडे यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली.

टॅग्स :प्रवीण तरडेनितीन चंद्रकांत देसाईमराठी अभिनेताबॉलिवूड