Sarsenapati Hambirrao Box Office Collection : ‘परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट,’ असा एक संवाद ‘सरसेनापती हंबीरराव’ (Sarsenapati Hambirrao) या चित्रपटात आहे. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा तितकाच ‘तिखट’ ठरला. प्रवीण तरडे (Pravin Tarde ) यांनी दिग्दर्शित केलेला आणि त्यांचीच मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धूम करतोय. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटानंतर घराघरात पोहोचलेले प्रवीण तरडे हे स्वराज्याचे सरसेनापती सरनोबत हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चित्रपटगृंहात या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. 27 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 3 दिवसांत कोटींची कमाई केली आहे.
या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसात 8.71 कोटींची कमाई केली आहे. तसेच येत्या काही दिवसात हा चित्रपट 15 कोटींचा पल्ला गाठेल,असा अंदाजही वर्तवला जात आहे.प्रवीण तरडे यांनी तीन दिवसांतील कमाईचा आकडा शेअर करत, प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ‘फक्त तीन दिवसात सरसेनापतींनी रचला इतिहास, फक्त आणि फक्त रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे..., असाच लोभ असू द्या... सहकुटुंब सहपरिवार पहा आपला सिनेमा,’ असं कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्या नेतृत्वात सरसेनापतीपदाचा बहुमान मिळालेले सेनापती हंबीरराव मोहिते हे एकमेव सेनापती ठरले. जितके पराक्रमी तितकेच धीरगंभीर आणि सबुरीने काम करणारे स्वराज्यनिष्ट सेनापती अशी त्यांची ख्याती होती.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची आणि प्रशासनाची पूर्ण ओळख असलेला, गनिमी काव्यात निष्णात आणि प्रामाणिक असा योद्धा असे गुण त्यांच्यात होते.