मराठी सिनेमा TDM ला शोज न मिळाल्याने दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी यापुढे सिनेमाच न बनवण्याचा निर्णय घेतला. TDM ची टीम अक्षरश: थिएटरमध्ये ढसाढसा रडली. तर त्याचवेळी रिलीज झालेला 'महाराष्ट्र शाहीर' हा मराठी सिनेमा मात्र चांगला चालला. या वादावर आता अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांनी मत व्यक्त केलं आहे.
प्रविण तरडे म्हणाले,"टीडीएम चित्रपटाला शो मिळत नाहीत हे पाहून मी स्वतः थिएटर मालकांशी बोललो आहे. आम्हाला तुम्ही जसा पाठिंबा देता तसा तुम्ही भाऊराव कऱ्हाडेला सुद्धा करावा अशी मी मागणी केली होती.सध्या हिंदी चित्रपटही फारसे रिलीज झालेले नाहीत मग मराठी चित्रपटाला शो का मिळत नाहीत. जर हिंदी चित्रपट स्पर्धा करायला नाहीत तर मग ही फाईट मराठी चित्रपटामध्येच आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला."
प्रविण तरडे यांचा 'बलोच' सिनेमाही आज प्रदर्शित झाला आहे. दरम्यान एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, "आज सिनेमा बंद पडला तर आम्हाला फाशी घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.साडेतीन कोटींचं कर्ज काढून सिनेमा केलाय कुठल्या कुठल्या बँकेचं कर्ज आहे, पै पै उभी केली आहे आम्ही. हा कलाकारांचा मर्डर आहे. माफक अपेक्षा आहे जे आमच्या वाट्याचं आहे ते आम्हाला द्या."