प्रवीण तरडे हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते - दिग्दर्शक. प्रवीण यांनी आजवर 'रेगे', 'पांडू', 'मुळशी पॅटर्न' अशा सिनेमांमध्ये केलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. याशिवाय 'देऊळ बंद', 'मुळशी पॅटर्न' आणि 'धर्मवीर' अशा सिनेमांचं दिग्दर्शन प्रवीण तरडेंनी केलंय. नुकतंंच प्रवीण तरडे यांनी लोकमत फिल्मीच्या 'आपली यारी' या खास एपिसोडमध्ये लहानपणी केलेल्या करामती सांगितल्या आहेत.
भंगार विकून प्रवीण तरडे करायचे ही गोष्ट
'आपली यारी'च्या नवीन भागात प्रवीण तरडेंसोबत त्यांचे दोन खास मित्र देवेंद्र गायकवाड आणि पिट्या भाई उर्फ रमेश परदेशी यांचाही सहभाग होता. यावेळी बोलताना प्रवीण तरडेंनी त्यांच्या लहानपणीचा किस्सा सांगितला आहे. प्रवीण तरडे आणि त्यांचे इतर मित्र आपसासच्या बांधकाम सुरु असलेल्या बिल्डिंगचं भंगार गोळा करायचे. मुबलक भंगार गोळा झालं की, भंगार विकणाऱ्या व्यक्तींचा खास आवाज काढत ते भंगार विकायचे.
भंगार विकून पाहायचे सिनेमा
भंगार विकून प्रवीण तरडेंना पाच ते सहा रुपये मिळायचे. मग या जमा केलेल्या पैशांनी मित्रांसोबत प्रवीण तरडे सिनेमा पाहायचे. त्यावेळी विजय टॉकीज जे डेक्कन भागात आहे, ते प्रवीण तरडेंच्या घरापासून लांब होतं. मग काय प्रवीण तरडे आणि त्यांचे मित्र रमेश आणि देवेंद्र पळत सुटायचे. 'मुळशी पॅटर्न'मधल्या राहूल्या सारखे हे मित्र जीव तोडून थिएटरपर्यंत धावायचे. त्यावेळी सिनेमांचं इतकं वेड होतं की सिनेमामध्येच करिअर करायचं हे त्यांनी ठरवलं होतं. आणि पुढे प्रवीण तरडेंनी आपलाच शब्द खरा करुन दाखवला.