Join us  

मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रविण तरडेंची पोस्ट, म्हणाले- "करोनाच्या महामारीत तू पुण्याला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 10:14 AM

Muralidhar Mohol : मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रविण तरडेंची पोस्ट, म्हणाले- "करोनाच्या महामारीत तू पुण्याला..."

Muralidhar Mohol : लोकसभा निवडणुकीत NDA ला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवारी(९ जून) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींच्या या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांची वर्णी लागली आहे. या सहा नेत्यांपैकीच एक म्हणजे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भरघोस मतांनी निवडूण येत मुरलीधर मोहोळ यांनी खासदारकीची माळ गळ्यात घातली. पहिल्याच निवडणुकीत खासदार झालेल्या मोहोळ यांना मोंदीच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळालं. अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर त्यांच्यासाठी पोस्ट लिहिली आहे. तरडेंनी मोहोळ यांचा शपथ घेतानाचा फोटो शेअर केला आहे. 

प्रविण तरडेंची पोस्ट

मित्रा,

आज शब्दं अपुरे पडतील पण लेखन थांबायचं नाही. कित्येक जण योगायोगानं राजकारणात येतात पण तू काहीतरी ठरवून यामधे आलास. राजकारणात येवून लोक समाजकारण लोणच्यासारखं वापरतात पण तू ते ताट भरून घेतलंस, पोटभरून रिचवलंस...कदाचित म्हणूनच कोरोनाच्या महामारीत तू पुण्याला वाचवलंस .

तुझ्या त्या पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली अन् पुणेकरांनी पण त्याची सव्याज परतफेड केली...तुला लाखोच्या मताधिक्यानं दिल्ली दाखवली. दिल्लीनं तर दिलादारपणाचा कळस गाठला आणि थेट मंत्रीपदाची माळ तुझ्या गळ्यात घातली...

पण मित्रा एवढं सगळं होउनही असं वाटतंय ही तर फक्त सुरवात आहे अजुनही  “परम वैभवम नेतुमेतत स्वराष्ट्रम" या दैवी संदेशापासून आपण थोडं दूरच आहोत. येत्या पंचवीस वर्षात जितकं जमेल तितकं या दैवी संदेशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू...

पुण्येश्वराची पुण्याई तुझ्या पाठीशी आहेच बाकी मुळशीची शान , पुण्याचा अभिमान , भारत देशाचा स्वाभिमान ठरो...

🚩तुझं खूप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा 🚩

मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास

मुरलीधर मोहोळ मूळचे मुठा (ता. मुळशी) गावचे. कोल्हापुरात त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत त्यांनी प्रवेश केला. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष, शहर भाजप सरचिटणीस, पुणे महापालिका शिक्षण मंडळ सदस्य (२००२), महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक (२००७, २०१२, २०१७), महापालिका स्थायी समितीचे अध्यक्षपद (२०१७-२०१८) त्यांनी भूषवले. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक म्हणून (२०१७-१८) त्यांनी काम केले. २०१९-२२ ते पुण्याचे महापौर होते. अखिल भारतीय महापौर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. पीएमपीएमएल संचालक, पीएमआरडीए सभासद होते. त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक २०१९ मध्ये लढवली होती. भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केले आहे. यंदा प्रथमच त्यांना पुण्याचे खासदार होण्याचा मान मिळाला आहे.

टॅग्स :मुरलीधर मोहोळप्रवीण तरडेपुणे