देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीरसारखे चित्रपट देणारे निर्माते-दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) बिनधास्त, बेधडक स्वभावामुळे कायम चर्चेत असतात. प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’ (Mulashi Pattern) या चित्रपटातून शेतकऱ्यांच्या समस्या प्रकाशझोतात आणल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. परंतु हाच मुळशी पॅटर्न सगळ्या बड्या मराठी चॅनल्स, निर्माते आणि वितरकांनी विकत घेण्यास नकार दिला होता. हा खुलासा खुद्द प्रवीण तरडेंनी केला आहे.
प्रवीण तरडे यांनी पिंपरी चिंचवड येथे ‘दिशा सोशल फाउंडेशन’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न बऱ्याच मराठी लोकांनी नाकारल्याचा मोठा खुलासा केला. तसेच बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने तो चित्रपट विकत घेऊन चालवण्यात प्रवीण तरडे यांची मदत केली होती.प्रवीण तरडे म्हणाले, आम्ही मुळशी पॅटर्न घेऊन एका मोठ्या चॅनेलकडे गेलो जे चित्रपट घेतात. त्यांना आम्ही मुळशी पॅटर्न दाखवला, पण त्यांना काही केल्या तो चित्रपट पटला नाही. ती शहरी माणसे होती, त्यांनी मुळात कधी गाव किंवा शेतकऱ्याचे आयुष्य पाहिलेच नसावे त्यामुळे आणि चित्रपटातील भाषा ही थोडी रांगडी असल्याचे कारण देऊन त्यांनी हा चित्रपट घेण्यास नकार दिला. यामुळे माझे निर्माते चिंतेत पडले, कारण त्यांनी त्यांच्या वडिलांशी भांडून माझ्या या चित्रपटावर पैसे लावले होते.
प्रवीण तरडे यांना त्यांच्या ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी नुकताच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. यानंतर आता ते ‘मुळशी पॅटर्न २’ आणि ‘धर्मवीर २’ हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत.