- संजय घावरे
कलाकार :प्रवीण तरडे, गश्मीर महाजनी, श्रुती मराठे, मोहन जोशी, उपेंद्र लिमये, राकेश बापट, रमेश परदेशी, स्नेहल तरडे, देवेंद्र गायकवाड, अमित जाधव, सुनील अभ्यंकर, रेवती लिमये, सुनील पालवाल, सुनील अभ्यंकर, किरण यज्ञोपवीत, सुरेश विश्वकर्मा, क्षितीज दातेलेखक-दिग्दर्शक : प्रवीण तरडेनिर्माते: शेखर मोहिते पाटील, सौजन्या निकम, धर्मेंद्र बोराशैली : ऐतिहासिककालावधी : २ तास ३८ मिनिटेस्टार - चार
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या हिंदवी स्वराज्यातील पहिले सरसेनापती हंबीरराव उर्फ हंसाजी मोहिते यांची कथा या चित्रपटात आहे. हंबीररावांनी जशी छत्रपती शिवरायांना साथ केली, तशीच छत्रपती संभाजीराजांनाही केली होती. स्वराज्यातील दोन शक्तीशाली राजांच्या खांद्याला खांदा लावून मोघल आणि पोर्तुगीजांशी दोन हात करण्याचा पराक्रम हंबीररावांनी गाजवला होता. त्यांच्या याच पराक्रमाची यशोगाथा सादर करताना प्रवीण तरडेनं (Pravin Tarde) स्वराज्यातील काही अप्रकाशित पैलूंवर प्रकाश टाकला असून, या चित्रपटाच्या रूपात जणू स्वराज्य राखण्याची खंबीर मोहिमच सादर केली आहे. कथा-पटकथा-संवादलेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी चतुरस्र कामगिरी प्रवीणनं चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. (Sarsenapati Hambirrao Marathi Movie Review )
सुरुवात औरंगजेबाच्या दरबारापासून सुरू होते. स्वराज्याला हादरा देणारा पराक्रम गाजवून दरबारात परतलेल्या सर्जा खानवर औरंगजेब खूश असतो. सर्जा खान युद्धाचं वर्णन करू लागतो आणि शिवकालीन इतिहासातील एक सोनेरी अध्याय टप्पटप्प्यानं उलगडू लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीन महिने उरले असताना सरनोबत प्रतापराव गुजरांना गमावल्यानंतर नवीन सरसेनापतीचा शोध सुरू होतो. स्वराज्य रक्षणाची जबाबदारी हंसाजी मोहितेंकडे सोपवून त्यांना सरसेनापती हंबीरराव ही पदवी बहाल करण्यात येते. राजमाता जिजाऊंना दिलेला शब्द आणि छत्रपती शिवरायांना दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी छत्रपती संभाजीराजांच्या मागे सावलीप्रमाणे उभे राहून स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या वीराची कथा यात आहे.
लेखन दिग्दर्शन : प्रेक्षकांना नेमकं काय हवं हे प्रवीणनं ओळखलं असल्यानं ऐतिहासिक चित्रपटातही त्यांना हवं ते दिलं आहे. ऐतिहासिक कथानकाला रक्त उसळवणाऱ्या धारदार संवादांची अचूक जोड दिली असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा यथोचित वापर केला आहे.
पहिल्याच मोहिमेत हंबीररावांच्या रणनीती, राजनीती आणि चाणाक्ष बुद्धीमत्तेचं दर्शन घडतं. स्वराज्याप्रती एकनिष्ठ असलेल्या सरसेनापतींचं जीवनचरीत्र सादर करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, औरंगजेबाची अस्वस्थता, स्वराज्य विस्तारासाठी आखलेली दक्षिणेकडील मोहीम, महाजरांचं जाणं, त्यानंतर सोयराबाईंनी राजकारण करत राजाराम महाराजांना राजा बनवण्याचा घाट घालणं, सख्खा भाऊ असूनही हंबीररावांनी विरोध करून संभाजीराजांना गादीवर बसवणं, संभाजीराजांसोबत मोहिमा फत्ते करणं, पोर्तुगीजांची कातडी लोळवणं आणि अखेर स्वराज्यावरील घाव छातीवर झेलत हौतात्म्य पत्करणं या सर्व घटना या चित्रपटात सादर करण्यात आल्या आहेत. मध्यंतरापूर्वीच्या भागापेक्षा मध्यंतरानंतर खऱ्या अर्थानं सिनेमा पकड मजबूत करतो. प्रत्येक दृश्यागणिक खिळवून ठेवतो. छत्रपतींच्या गमनानंतरच्या दोन दृश्यांमध्ये विसंगती जाणवते. शब्दांची अचूक बांधणी करून अंगावर रोमांच आणणारे संवाद प्रेक्षकांना ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देण्यासाठी पुरेशा आहेत. काही ठिकाणी सिनेमा भावूकही करतो. गीत-संगीताची बाजू प्रभावी नाही. शिवकालीन लोकसंगीताची किनार जोडणं गरजेचं होतं. महेश लिमयेचं कॅमेरावर्क अफलातून आहे. कॉस्च्युमपासून गेटअप आणि कलादिग्दर्शनापासून साहसदृश्यांपर्यंत सर्व गोष्टी चांगल्या झाल्या आहेत. काही उणीवा राहिल्या आहेत, पण त्याकडं दुर्लक्ष करायला हरकत नाही. इतिहास दाखवतानाही काही ठिकाणी सिनेमॅटीक लिबर्टीचा आधार घेतला आहे.
कलाकारांचा अभिनय : हंबीररावांच्या भूमिकेत प्रवीणनं अक्षरश: जीव ओतला आहे. कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्यामागंही त्यानं अत्यंत शिताफीनं काम केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही व्यक्तिरेखा गश्मीर महाजनीनं मोठ्या खुबीनं निभावल्या आहेत, पण शंभूराजेंच्या भूमिकेत तो उजवा वाटतो. मोहन जोशींनी औरंगजेबाला न्याय दिला आहे. श्रुती मराठेनं सोयराबाईच्या भूमिकेत स्वराज्यासाठी घातक ठरलेली प्रवृत्ती चांगल्या प्रकारे सादर केली आहे. सुनील अभ्यंकरांनी अनाजी पंत, किरण यज्ञोपवीत यांनी मोरोपंत आणि राकेश बापटनं सर्जा खान छान साकारला आहे. स्नेहल तरडे, उपेंद्र लिमये, सुनील पालवाल या सर्वांचीही कामं चांगली झाली आहे.
सकारात्मक बाजू : स्वराज्यासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या महापराक्रमी मावळ्याची गाथा या निमित्तानं आजच्या पिढीसमोर आली आहे.
नकारात्मक बाजू : मध्यंतरापूर्वीच्या भागाची गती संथ असल्यानं लांबल्यासारखा वाटतो. काही त्रुटी राहिल्या असून, कर्णमधूर संगीताची उणीव भासते.
थोडक्यात : स्वराज्यासाठी छातीवर झेललेले घाव दागिन्यासारख्या मिरवणाऱ्या पराक्रमी योद्ध्याची गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनंतर चहूबाजूंनी गनिमांच्या घेऱ्यात अडकल्यावरही शंभूराजांनी सांभाळलेल्या स्वराज्याची झलक दाखवणाऱ्या या चित्रपटात काही नवे पैलू उलगडण्याचं धाडस करण्यात आल्यानं पहायला हवा.