प्रविण तरडे यांनी दिग्दर्शित केलेला मुळशी पॅटर्न हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच लोकप्रियता लाभली होती. या चित्रपटानंतर प्रवीण तरडे प्रेक्षकांसाठी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. प्रविण तरडे यांचा आगामी चित्रपट हा एका वेगळ्याच विषयावर असून त्यांनी या चित्रपटावर काम करायला देखील सुरुवात केली आहे.
प्रविण तरडे यांनीच फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरून त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यासोबतच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद देखील त्यांचेच आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळवणारे हंबीरराव मोहिते यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. याच हंबीरराव मोहितेंच्या आयुष्यावर आधारित प्रविण तरडे चित्रपट बनवत असून पुण्यात शिवजंयतीच्या निमित्ताने निघालेल्या एका मिरवणुकीत त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली. प्रविण तरडे यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट लिहून सांगितले आहे की, हिंदवी स्वराज्य राखलेल्या दोन्ही छत्रपतींचा सरसेनापती होण्याचा बहुमान ज्या एकमेव माणसाला मिळाला त्याची ही गोष्ट... सरसेनापती हंबीरराव हे नाती नाही माती जपणारे योद्धा होते.
या चित्रपटाची निर्मिती संदिप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची असून या चित्रपटाला संगीत नरेंद्र भिडे देणार आहेत तर गीते प्रणीत कुलकर्णी लिहिणार आहेत आणि छायाचित्रण महेश लिमये यांचे आहे. या चित्रपटात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलाकार मुख्य भूमिकेत असणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात हंबीरराव मोहिते यांची मुख्य भूमिका कोण साकारणार यावर चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. शिवराज्याभिषेक दिनी म्हणजेच ६ जून २०१९ रोजी या चित्रपटातील मुख्य कलाकारांच्या नावाची घोषणा होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटावर सध्या प्रविण तरडे आणि त्यांची टीम काम करत असून हा चित्रपट जानेवारी २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे म्हटले जात आहे.