Join us

‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा आगामी ऐतिहासिक चित्रपट, शूटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 3:29 PM

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला.

कोणत्याही चित्रपटाचा मुहूर्त म्हटलं की तो एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीच्या हस्ते करणे ही एक परंपरा आहे. मात्र या परंपरेला छेद देत लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी एक आदर्श पायंडा निर्माण केला, मुहूर्ताचा क्लॅप देण्याचा मान राज्याच्या विविध शहरातील चित्रपटगृहांच्या डोअर किपर्स, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांना देण्यात आला. ही अभूतपूर्व घटना राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला घडली.

शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणार्‍या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर प्रविण तरडे घेऊन येत असलेल्या या भव्य चित्रपटाची निर्मिती उर्विता प्रॉडक्शन्स यांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला.

सातारा जिल्ह्यातील साप गावात संपन्न झालेल्या या मंगलमय सोहळ्याला चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा व सौजन्य सुर्यकांत निकम हे तीन निर्माते तसेच  माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते पाटील, डीओपी महेश लिमये, ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे निर्माते अभिजीत भोसले, सिटी प्राइड चित्रपटगृह समूहाचे व्यवस्थापक सुगत थोरात, क्रिएटिव्ह प्रोड्युसर रमेश परदेशी, मार्केटिंग डायरेक्टर विनोद सातव, कार्यकारी निर्माते विशाल चांदणे, मिलिंद झांबरे, तेजस गानू, मयूरेश दळवी, अक्षय जोशी, अजिंक्य शिंगारे, पै. गणेश फणसे, सूरज भिसे, चेतन चव्हाण, योगेश टकले, श्रीहरी काळे, वेदांग शिंदे, रणजीत ढगे पाटील, शेखर मोहिते पाटील, तुषार भामरे  यांच्यासह औरंगाबाद, नाशिक, पुणे या शहरातील चित्रपटगृहांचे व्यवस्थापक, डोअर किपर्स, बुकिंग क्लार्क, प्रोजेक्टर ऑपरेटर्स आणि चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.

‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रविण तरडे आता ऐतिहासिक विषय घेऊन आले आहेत. ‘सरसेनापती हंबीरराव’ या अतिशय भव्यदिव्य मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते तसेच बहिर्जी नाईक, सोयराबाई, औरंगजेब, संताजी धनाजी आणि सर्जाखान या महत्वाच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे, ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :प्रवीण तरडे