'बस स्टॉप'च्या गाण्यांना प्रेक्षकांची मिळतेय पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 6:53 AM
मराठी रॅपर श्रेयश जाधव निर्मित आणि समीर जोशी दिग्दर्शित बसस्टॉप या सिनेमामध्ये निव्वळ धम्माल, मस्ती नव्हे तर नात्याची भावनिक ...
मराठी रॅपर श्रेयश जाधव निर्मित आणि समीर जोशी दिग्दर्शित बसस्टॉप या सिनेमामध्ये निव्वळ धम्माल, मस्ती नव्हे तर नात्याची भावनिक गुंफणदेखील पाहायला मिळणार आहे. या सिनेमातील 'मूव्ह आॅन', 'आपला रोमान्स', घोका नाही तर होईल धोका' आणि 'तुझ्या सावलीला' या गीतांनी तरुणाईला भुरळ घातली आहे. या गाण्यांना ऋषिकेश-सौरभ-जसराज आणि आदित्य बेडेकर यांनी संगीत दिले आहे.लोकमतला दिलेल्या भेटीदरम्यान समीर जोशी सांगतात, या सिनेमामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे हा असा बस स्टॉप आहे जिथे सगळी मंडळी भेटतात आणि आपापल्या कॉलेजला जातात. हे सगळेजण आयुष्याच्या, शिक्षणाच्या अशा टप्यावर उभी आहेत, जिथून त्यांना कॉलेज पूर्ण करून बाहेरच्या जगात जायचे आहे. तिथे जाताना त्यांनी कुठली बस पकडायची, कोणत्या गोष्टींच्या मागे धावायचं, कोणत्या ठिकाणी पोहचायचं हे त्यांनाच ठरवायचं आहे. सिनेमातील बसस्टॉप थोडा मनाचा गोंधळ निर्माण करणारा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकासमोर दोन पर्याय आहेत; प्रेम की करिअर. त्यात ही मंडळी कुठली बस निवडतात, किंबहुना त्यांनी कोणती बस निवडायला हवी हे सांगण्याचा प्रयत्न सिनेमातून केला आहे. या चित्रपटाविषयी अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सांगतो, आमच्या सिनेमाचे नाव हे प्रतीकात्मक आहे. यामध्ये सिनेमात दाखविलेली कॉलेजची मुले ही पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. प्रत्येकाचे बस पकडण्याचे ठिकाण वेगळे असते पण थांबावं एकाच ठिकाणी लागतं असं या नावातून आम्हाला सुचवायचं आहे. आजची पिढी आणि पालकत्व यावर भाष्य करणाऱ्या 'बसस्टॉप' या सिनेमाच्या निर्मितीसाठी श्रेयश जाधवसोबत पूनम शेंडे, गजेंद्र पाटील, आसू निहलानी या तिघांनीदेखील महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, रसिका सुनील, अक्षय वाघमारे, मधुरा देशपांडे, सुयोग गोरे अशी तगडी स्टारकास्ट यात पाहायला मिळणार असून अविनाश नारकर, संजय मोने, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी या ज्येष्ठ कलाकारांच्यादेखील यात प्रमुख भूमिका आहेत. Also Read : ...आणि अनिकेत विश्वासरावला पाण्यात ढकलून पूजा सावंतने काढला पळ