Join us  

'प्रेम करूया खुल्लमखुल्ला'मधील अंबूची झालीय बिकट अवस्था, आहे अंथरुणाला खिळून

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 3:34 PM

प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटात विद्या पटवर्धन यांनी अंबूचे पात्र साकारले होते. हे पात्र विनोदी तर होतेच मात्र केसांची केलेली विशिष्ट रचना खूपच मजेशीर वाटायची.

मराठी चित्रपट, नाटक अभिनेत्री आणि बालमोहन विद्यामंदिर शाळेच्या शिक्षिका अशा भूमिकेत वावरणाऱ्या विद्या पटवर्धन (Vidya Patwardhan) या गेल्या काही वर्षांपासून दुर्धर आजाराने त्रस्त आहेत. आपले संपुर्ण आयुष्य त्यांनी बालरंगभूमीला वाहिले. अशातच बालमोहन शाळेतील अनेक बालकलाकारांना त्यांनी घडवले आहेत. शाळेत शिक्षिकेची जबाबदारी सांभाळत असताना बालनाट्याचे त्या दिग्दर्शन करायच्या. नाटकाच्या दौऱ्यात उशीर झाला तर आपल्या मिळालेल्या पगारातून त्या मुलांसाठी खाऊ पाण्याची व्यवस्था करायच्या. मुलांच्या पोटात दोन घास जावेत म्हणूनही त्या नेहमी प्रयत्नशील असायच्या. यातील बहुतेक कलाकार मंडळी आज मराठी सृष्टीत नावलौकिक मिळवताना दिसत आहेत.

विद्या पटवर्धन यांनी प्रेम करूया खुल्लम खुल्ला या चित्रपटात अंबुचे पात्र साकारले होते. हे पात्र विनोदी तर होतेच मात्र केसांची केलेली विशिष्ट रचना खूपच मजेशीर वाटायची. नशीबवान या चित्रपटातही त्यांच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली होती. गेली अनेक वर्षे ते मराठी सिनेइंडस्ट्रीशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांचा हा प्रवास बालमोहनच्या शिक्षकांनी देखील जवळून अनुभवला आहे. त्याचमुळे त्यांच्या अशा अवस्थेत ही शिक्षक मंडळी जमेल तशी त्यांची मदत करत आहेत. 

एका दुर्धर आजारामुळे विद्या पटवर्धन गेल्या काही वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. त्यांना चालताही येणे कठीण आहे. अशा अवस्थेत कोणी जवळचे नातेवाईक नसल्याने त्यांची सेवा बालमोहनच्या शिक्षकांनी तसेच त्यांचे विद्यार्थी म्हणजेच आताचे कलाकार मंडळी करत आहेत. त्यांची रोजची सेवा करण्यासाठी एका महिलेची नियुक्ती करण्यात आली असून औषधोपचाराचाही खर्च खूप जास्त असल्याने आता आणखी काही मदत मिळावी म्हणून वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत.

अद्वैत थिएटर त्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. अद्वैत थिएटरच्या मदतीने अलबत्या गलबत्या या नाटकाचा एक विशेष प्रयोग आयोजित करण्यात आला होता. १९ मार्च २०२३ रोजी दादरच्या शिवाजी मंदिर येथे हा प्रयोग पार पडला. या नाटकाच्या तिकीट विक्रीतून जो निधी जमला तो विद्या पटवर्धन यांच्या उपचारासाठी देण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी यांनी देखील खारीचा वाटा म्हणून विद्या ताईंच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला होता.