प्रयोगोत्सव २०१८मध्ये झी युवाच्या कलाकारांची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 10:50 AM
झी युवा या वाहिनीने नेहमीच नवोदित कलाकारांना तसेच त्यांना घडवणाऱ्या माध्यमांना पाठिंबा दिला आहे. रंगभूमी आणि एकांकिकांमध्ये महत्त्वाचे योगदान ...
झी युवा या वाहिनीने नेहमीच नवोदित कलाकारांना तसेच त्यांना घडवणाऱ्या माध्यमांना पाठिंबा दिला आहे. रंगभूमी आणि एकांकिकांमध्ये महत्त्वाचे योगदान असणाऱ्या प्रयोगोत्सव २०१८ च्या दुसऱ्या पर्वात झी युवाने देखील मोलाचा वाटा उचलला आहे. तसेच झी युवाच्या कलाकारांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. झी युवा या 'प्रयोगोत्सव २०१८' साठी चॅनल पार्टनर म्हणून कार्यरत आहे.बऱ्याचदा काही कारणास्तव कित्येक प्रेक्षकांना, कलाकारांना तसेच दिग्गजांना एकांकिकांच्या प्रयोगाला मुकावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी या प्रयोगोत्सवात २०१७ आणि २०१८ मधील सात निवडक सर्वोत्कृष्ट एकांकिका सादर करण्यात आल्या. मागील वर्षातील काही दर्जेदार एकांकिकांच्या प्रयोगांचा उत्सव म्हणजेच 'प्रयोगोत्सव'. प्रयोगोत्सव २०१८ मुंबईतील रविंद्र नाट्यमंदीर येथे सादर केला गेला.शुभ यात्रा, माणसं, पॉज, डॉल्बी - वाजलं की धडधडतंय, सॉरी परांजपे, मॅट्रिक आणि निर्वासित या सात एकांकिका यावेळी प्रयोगोत्सवामध्ये सादर करण्यात आल्या. या प्रयोगोत्सवाची रंगत वाढवण्यासाठी ऑफिशियल पार्टनर असलेल्या झी युवावरील लोकप्रिय कलाकार या एकांकिका पाहायला आले होते. अंजली मधील हर्षद अतकरी आणि भक्ती देसाई, फुलपाखरू मधील ऋतुजा धारप आणि ओंकार राऊत, देवाशप्पथ मधील कौमुदी वालोलकर, अमृता देशमुख, सीमा देशमुख आणि विद्याधर (बाप्पा) जोशी आणि बापमाणूस मधील सुयश टिळक, पल्लवी पाटील, श्रुती अत्रे आणि दिग्दर्शक भीमराव मुडे त्यांच्या उपस्थितीने समारंभाला शोभा आणली होती. प्रयोगोत्सवामुळे कलाकारांना आपली कलाकृती दिग्गज कलाकारांसमोर सादर तर करता आलीच शिवाय अनेक दिग्गज रंगकर्मींचा स्वहाताने गौरवही करता आला. या नवोदित कलाकारांच्या हस्ते नाट्यक्षेत्रात मोलाचे योगदान दिलेल्या सात रंगकर्मींचा सत्कार करण्यात आला. अशोक पालेकर, जयराज नायर, अरुण काकडे, विद्याताई पटवर्धन, सविता मालपेकर, शरद सावंत आणि शितल शुक्ल आदी दिग्गज रंगकर्मींना गौरवण्यात आले. एवढेच नव्हे तर प्रत्येक एकांकिकेलाही सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या सन्मानचिन्हाचीही एक वेगळी खासियत आहे. प्रत्येक एकांकिकेचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याआधारे सन्मानचिन्हं तयार करण्यात आली आहेत. एकूण काय तर प्रयोगोत्सव २०१८ अतिशय यशस्वी झाला आणि त्यासाठी झी युवाच्या कलाकारांनी या एकांकिकांचा मनसोक्त आनंद लुटला.