Join us

राजकुमार हिराणींने केले ‘चुंबक’चे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 12:27 PM

हिराणी यांच्यासाठी नुकताच ‘चुंबक’च्या एका विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. हा चित्रपट हृदयाला भिडतो आणि त्यात काम केलेल्या प्रत्येक कलाकाराने उत्तम काम केले आहे, असे उद्गार त्यांनी चित्रपट पाहिल्यावर काढले.

ठळक मुद्देस्वानंद किरकिरेने यांतील प्रसन्नाची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे‘चुंबक’ महाराष्ट्रात सर्वत्र २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे

मुन्नाभाई एमबीबीएस, थ्री इडीयट्स आणि संजूसारखे हिट चित्रपट देणारे आघाडीचे बॉलीवूड दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी ‘चुंबक’ पाहिला आणि त्याची भरभरून स्तुती केली. हा चित्रपट हृदयाला भिडतो आणि त्यात काम केलेल्या प्रत्येक कलाकाराने उत्तम काम केले आहे, असे उद्गार त्यांनी चित्रपट पाहिल्यावर काढले. हिराणी यांच्यासाठी नुकताच ‘चुंबक’च्या एका विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते. या शोनंतर त्यांनी म्हटले, “स्वानंद किरकिरे यांना आपण एक उत्तम गीतकार म्हणून जाणतोच, पण या चित्रपटातून ते एक उत्तम कलाकार असल्याचेही सिद्ध झाले आहे. सौरभ भावे यांनी एक छान कथा लिहिली असून त्याला संदीप मोदी यांचे प्रगल्भ दिग्दर्शन लाभले आहे. साहिल जाधव आणि संग्राम देसाई या नवोदितांनी उत्तम काम केले आहे. या चित्रपटाची जबाबदारी उचलल्याबद्दल नरेन कुमार आणि अक्षय कुमार यांना माझा सॅल्युट.”

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारची प्रस्तुती असलेला बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘चुंबक’ महाराष्ट्रात सर्वत्र २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेले प्रख्यात गीतकार आणि गायक स्वानंद किरकिरे पहिल्यांदाच मराठी चित्रपटात काम करत असून प्रमुख भूमिका असलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून अरुणा भाटीया, केप ऑफ गुड फिल्म आणि कायरा कुमार क्रिएशन हे या चित्रपटाचे सहानिर्माते आहेत.

 अक्षय कुमारने या चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. अक्षय कुमारने या चित्रपटाबद्दल बोलताना म्हटले आहे की, तुम्ही आयुष्यात ज्या निवडी करता त्यांबद्दल हा चित्रपट भाष्य करतो. “तुम्ही आधी तुमच्या आयुष्यातील निवड घडवता आणि नंतर निवड तुम्हाला घडवते,” तो म्हणतो. ‘चुंबक’ची प्रस्तुती करण्याची निवड अक्षय कुमार यांनी हा चित्रपट पाहिल्यानंतर घेतला. 

स्वानंद किरकिरेने यांतील प्रसन्नाची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. ही भूमिका पाहिल्यानंतर या भूमिकेने या चित्रपटाशी जोडले जाण्यास मला भाग पाडले, असे अक्षय कुमारने सोशल मीडियावर म्हटले होते. किरकिरे त्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना म्हणतो, “ही भूमिका एक आव्हानच नाही तर ती माझ्यासाठी एक भेटसुद्धा होती. या भूमिकेने मला माझ्या आयुष्यातील अनेक महत्वाचे धडे शिकवले आणि आयुष्याच बदलून टाकले आहे.”  

या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. त्यांनी ‘फस गये रे ओबामा’, ‘जॉली एलएलबी १’ व‘जॉली एलएलबी २’ आणि ‘गुड्डू रंगीला’ या चित्रपटांची निर्मिती केली. नुकत्याच आलेल्या ‘सोनू के टीटू कि सिटी’ या चित्रपटाचे ते सह-निर्माता होते. त्यांनी ‘कायरा कुमार क्रीएशन्स’ ही स्वतःच्या मुलीच्या नावावरून सुरु केलेली निर्मित कंपनी असून ‘चुंबक’ हा त्यांची निर्मिती असलेला पहिलाच चित्रपट आहे.

दिग्दर्शक संदीप मोदी यांनी अगोदर सोनम कपूर अभिनित ‘नीरजा’ या सिनेमाचे सह-दिग्दर्शन केले होते. याशिवाय त्यांनी आशुतोष गोवारीकर, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि अगदी राम गोपाल वर्मांसारख्या दिगज्जांसोबत काम केले आहे. संदीप यांनी अनेक पुरस्कार विजेत्या लघुपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले असून फिचर लेंथ फिल्म म्हणून चुंबक हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे.  

टॅग्स :स्वानंद किरकिरेराजकुमार हिरानी