हलाल, ३१ ऑक्टोबर, संघर्षयात्रा या चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झाल्यानंतर प्रीतम कागणे अहिल्या या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती एका डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. खास या भूमिकेसाठी प्रीतमने बुलेट चालवण्यापासून दोन महिन्यांचं खडतर पोलिस प्रशिक्षणही घेतलं आहे .
सुधीर चारी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केले आहे. नितीन तेंडुलकरच्या गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटात प्रीतमसह प्रिया बेर्डे, रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, नूतन जयंत, निशा परूळेकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे. प्रचंड कष्ट करून आयपीएस झालेल्या एका महत्त्वाकांक्षी महिला पोलीस अधिकाऱ्याची रंजक कथा अहिल्या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
प्रीतमने या चित्रपटातील भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्या विषयी प्रीतम सांगते, 'पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मी या पूर्वी कधीही साकारलेली नाही. अहिल्या चित्रपटाने ती मला संधी दिली. पोलिसांच्या जगण्याचे विविध कंगोरे या भूमिकेला आहेत. या भूमिकेसाठी फिजिकल फिटनेस वाढवणं आवश्यक होतं. त्यामुळे सायकलिंग, स्विमिंग, कराटे खेळायला शिकले. दोन महिन्यांचे खडतर पोलिस प्रशिक्षणही घेतलं. आव्हान होतं, बुलेट शिकणं... बुलेट शिकताना चार-पाच वेळा धडपडलेही... मात्र, हार न मानता बुलेट चालवायला शिकले. त्यामुळे या भूमिकेला जिवंत करता आलं. या चित्रपटासाठी मीही खूप उत्सुक आहे.'
अहिल्या चित्रपटाबरोबरच प्रीतमचा मान्सून फुटबॉल मराठी हिंदी चित्रपट आणि आणखी तीन चित्रपटही लवकरच येणार आहेत.
अहिल्या या चित्रपटाविषयी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. या चित्रपटातील गीत सचिनचा भाऊ नितिनने लिहिले आहे. आपल्या भावाच्या या गीतासाठी सचिनने ट्वीट केले होते. आपल्या ट्विट मध्ये त्याने लिहिले होते की, सामर्थ्यवान शब्दांना उत्कृष्ट स्वर लाभले आहेत. मी या गाण्याची आतुरतेने वाट बघतोय. तसेच शंकर महादेवन, नितीन तेंडुलकर, श्रीधर चारी, प्रवीण कुंवर, राजू पार्सेकर यांच्या नावांचा उल्लेख करून अभिनंदन केले. या ट्विटला रीट्विट करत शंकर महादेवन यांनी सचिनचे आभार मानत तुझे हे शब्द माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत खरंच तुझा भाऊ आणि संगीतकार प्रवीण कुंवर यांच्या करता गायलो हा माझा सन्मान समजतो.’