अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) आणि अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. त्या दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. प्रिया आणि उमेश सोशल मीडियावर सक्रीय असून ते या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान आज प्रिया आणि उमेश सोशल मीडियावर लाइव्ह आले होते आणि यावेळी त्यांनी चाहत्यांशी संवाद साधत एक गुड न्यूज दिली आहे. ही खुशखबर काय आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर प्रिया आणि उमेश तब्बल १० वर्षांनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करताना दिसणार आहेत.
होय. हे खरंय. खुद्द प्रिया बापट आणि उमेश कामतने इंस्टाग्रामवर लाइव्ह येऊन चाहत्यांना आनंदाची वार्ता सांगितली आहे. उमेश म्हणाला की, आम्ही नवीन नाटक घेऊन येत आहोत. नवा गडी नवा राज्य या नाटकानंतर तब्बल १० वर्षानंतर आम्ही एकत्र रंगभूमीवर दिसणार आहोत. या नाटकाचं नाव आहे जर तरची गोष्ट. या नाटकाचा पहिला प्रयोग होणार आहे ५ ऑगस्टला मुंबईमध्ये आणि १२ ऑगस्टला पुण्यामध्ये. त्याचे बुकिंग सुरू होणार आहे बुक माय शोवर उद्या (१८ जुलै).
दशकानंतर प्रिया - उमेशची 'जर तर ची गोष्ट'पुढे प्रिया म्हणाली की, आम्ही बऱ्याच स्क्रीप्ट वाचत होतो. चांगल्या स्क्रीप्टच्या प्रतीक्षेत होतो. इरावती कर्णिकने हे नाटक लिहिले आहे. ती खूप जवळची मैत्रिण आहे आणि आमच्या दोघांची आवडती लेखिका आहे. मला तिचे विचार, लिहण्याची पद्धत मला खूप आवडतात. माझी खूप इच्छा होती की, इराने लिहिलेल्या नाटकात काम करायचे. मी आजपर्यंत एकच व्यावसायिक नाटक केले ते म्हणजे नवा गडी नवं राज्य. ते २०१० ला ओपन झालं आणि २०१४ला त्याचा शेवटचा प्रयोग झाला. त्यानंतर जवळपास १० वर्षानंतर म्हणजेच २०२३ला मी पुन्हा रंगभूमीवर येते आहे. तर मला माझ्या जवळच्या व्यक्तींसोबत काम करायचे होते. त्यातलं पहिलं नाव म्हणजे इरा आणि दुसरा उमेश कामत.
मी उमेशची लहानपणापासून फॅन आहे. मी असे म्हणते कारण मी ८ वर्षे उमेश पेक्षा लहान आहे. मला त्याला स्टेजवर काम करताना पाहायला आवडते. तो सपोर्टिव्ह आणि उत्तम सहकलाकार आहे. माझे हे देखील ठरले होते की पुढचं कोणतं नाटक केलं तर ते उमेश सोबतच करायचे. जर तरची गोष्ट नाटकाचेही हजारो प्रयोग होतील, अशी मला आशा आहे, असे प्रियाने म्हटले.
प्रिया बापट सादर करत असलेल्या, सोनल प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचे नाव 'जर तर ची गोष्ट' असे आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर, रणजित पाटील यांनी केले असून इरावती कर्णिक यांनी लेखन केले आहे. तर नंदू कदम ‘जर तर ची गोष्ट’चे निर्माते आहेत. या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय प्रमुख भूमिकेत दिसतील.