Join us

नाटकानंतर भेटायला आलेल्या महिलेने विचारलं "गुडन्यूज कधी देणार?", प्रियाने बापटने दिलं थेट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 3:46 PM

"पोलका ड्रेसमधला फोटो टाकला म्हणून त्यांना वाटलं मी प्रेग्नंन्ट आहे" - प्रिया बापट

प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकरून प्रियाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. प्रिया अभिनयाबरोबरच तिच्या बिनधास्त स्वभावासाठीही ओळखली जाते. प्रियाने २०११ साली अभिनेता उमेश कामतशी लग्न करत संसार थाटला. पण, लग्नानंतर १३ वर्षे होऊनही मुल नसल्याने अनेकदा प्रिया आणि उमेशला याबाबत विचारलं जातं. नाटकाच्या प्रयोगाला आलेल्या एका प्रेक्षकानेही प्रियाला याबाबत प्रश्न विचारला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियाने याबाबत भाष्य केलं. 

प्रियाने नुकतीच 'हॉटरफ्लाय' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रियाने तिच्या आयुष्यातील घडलेले अनेक प्रसंग सांगितले. या मुलाखतीत विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना तिने अगदी बिनधास्तपणे उत्तरे दिली. लग्नानंतर इतक्या वर्षांनीही मुल नाही याबद्दल विचारल्यावर तुझी काय प्रतिक्रिया असते? या प्रश्नाचं उत्तर देताना प्रिया म्हणाली, "लग्न झालं आणि मूल झालं तरच तुमचं आयुष्य पूर्ण होतं, असा विचार आपण का करतो? मूल नको असलेल्या आणि तरीही आनंदी राहणाऱ्या अनेक महिला आहेत. त्यांनाही त्यांचं आयुष्य पूर्णच वाटतं. माझा आणि उमेशच्या कपल फोटोवर अशा बऱ्याच कमेंट असतात. पण या कमेंट्स उमेशच्या फोटोवर नसतात. मी महिला असल्यामुळे या अपेक्षा माझ्याकडून आहेत. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी याबाबत निर्णय घेईन." 

"एका नाटकाच्या प्रयोगानंतर काकू आम्हाला भेटायला आल्या आणि त्यांनी मला विचारलं की आता गुडन्यूज कधी देणार? मी त्यांना म्हटलं की आताच तर एवढे अवॉर्ड मिळाले. ही गुडन्यूजच आहे. त्यावर त्या नाही असं म्हणाल्या. त्या प्रश्नाचं उत्तर देईपर्यंत त्या तिथून हलल्या नाहीत. मला मूल कधी होणार? हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. मी त्यांना म्हटलं की काकू माझ्या आईनेही हे मला कधी विचारलं नाही. प्लीज तुम्हीही विचारू नका," असं तिने सांगितलं. 

पुढे ती म्हणाली, "काही दिवसांपूर्वीच मी पोलका डॉट ड्रेस घातलेला एक फोटो पोस्ट केला होता. त्यावर लोकांनी प्रिया बापट प्रेग्नंट आहे, अशा कमेंट केल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की अनुष्का शर्मा जेव्हा गरोदर होती तेव्हा तिने पोलका डॉट ड्रेस घातला होता. तू पण पोलका डॉट ड्रेस घातलास म्हणजे तूदेखील प्रेग्नंन्ट आहेस."

टॅग्स :प्रिया बापटउमेश कामतसेलिब्रिटी