प्रिया बापट ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका, सिनेमा आणि नाटकांमध्ये काम करून प्रियाने कलाविश्वात तिचं स्वत:चं स्थान निर्माण केलं. मराठीबरोबरच प्रियाने हिंदीतही नाव कमावलं आहे. 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही तिची वेब सीरिज फारच लोकप्रिय ठरली होती. 'मुन्नाभाई एमबीबीएस', 'विस्फोट' या हिंदी सिनेमांमध्ये ती झळकली आहे. आता 'जिंदगीनामा' आणि 'रात जवाँ है' या सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पण, एकीकडे हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी प्रिया मराठी सिनेमांमध्ये मात्र फारशी दिसत नाही. याबाबत प्रियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
प्रियाने मराठी सिनेमांमध्ये न दिसण्याचं कारण स्पष्ट केलं. 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "मला २०१८ नंतर आजपर्यंत एकाही मराठी चित्रपटाची ऑफर आलेली नाही. एक मराठी चित्रपट गेल्या वर्षी उमेश आणि मी केला. तो आता कधी प्रदर्शित होईल हे मला माहीत नाही. पण, तो एक मराठी चित्रपट उमेश आणि मी एकत्र केला आहे. आम्ही दोघी हा माझा शेवटचा मराठी चित्रपट...त्यानंतर मी सिटी ऑफ ड्रीम्स वेब सीरिज केली. त्यानंतर आजतागायत एकाही मराठी सिनेमासाठी मला विचारणा झालेली नाही".
पुढे प्रिया म्हणाली, "जर प्रेक्षकांना मला मराठी सिनेमात बघायचं असेल तर मराठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनाही हे वाटलं पाहिजे आणि त्यांनी मला विचारलं पाहिजे. मी एकाही मराठी चित्रपटाला नाही म्हटलेलं नाही. मी याचा खूप विचार केला. मी हिंदीत करते तर मला मराठीत करायचं नाही, असंही माझं म्हणणं नाही. कारण, मी मराठी नाटक करतेच आहे. मराठी नाटकाची निर्मितीही मी करते आणि त्यात कामही करते".
'आम्ही दोघी' या सिनेमानंतर प्रिया मराठी सिनेमात दिसली नाही. या सिनेमात तिने मुक्ता बर्वेबरोबर स्क्रीन शेअर केली होती. पण, मराठी वेब सीरिज आणि नाटकांमध्ये मात्र प्रिया काम करताना दिसते. 'आणि काय हवं' या उमेश कामत आणि तिच्या वेब सीरिजलाही प्रचंड प्रेम मिळालं. याशिवाय 'जर तरची गोष्ट' या नाटकाचे प्रयोगही ती करत आहे.