आपल्या दमदार अभिनयशैलीमुळे मराठी कलाविश्वाचा स्तर उंचावर नेणारा अभिनेता म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde). मराठीसह बॉलिवूडमध्येही राज्य करणाऱ्या या अभिनेत्याने त्याची प्रत्येक भूमिका गाजवली. त्यामुळे आजही त्यांचे सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहतात. परंतु, मराठीत आपलं हक्काचं स्थान निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याने फार लवकर या जगातून एक्झिट घेतली. लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीसह प्रत्येक चाहता हळहळला होता. परंतु, त्यांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाची नेमकी अवस्था कशी झाली होती हे फारसं कोणाला माहित नाही. अलिकडेच त्यांची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे (priya berde)यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींवरचा पडदा दूर केला.
प्रिया बेर्डे यांनी अलिकडेच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला. प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत यांनी १९९८ साली लग्न केलं. परंतु, मूत्रपिंडाच्या आजारामुळे २००४ मध्ये लक्ष्मीकांत यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचा मुलगा अभिनेता अभिनय ७-८ वर्षांचा होता. तर, लेक स्वानंदी बरीच लहान होती. त्यामुळे लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डे यांच्यावर दु:खाच्या डोंगरासह घरची मोठी जबाबदारीही पडली. परंतु, अभिनय लहान असूनही त्याला खूप लवकर समज आली. प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत यांच्या निधनाच्या रात्री अभिनयमध्ये झालेला बदल कसा होता हे सांगितलं.
'तुम्हाला कशातून प्रेरणा मिळते?' असा प्रश्न या मुलाखतीमध्ये प्रिया बेर्डे यांना विचारण्यात आला होता. याचं उत्तर देत प्रिया बेर्डेंनी लक्ष्मीकांत यांच्या निधनाच्या रात्री काय घडलं हे सांगितलं. '‘लक्ष्मीकांत बेर्डे यांचं 16 डिसेंबरला निधन झालं. त्यानंतर माझ्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी सगळ्या बाजूने कशी भरुन काढायची हा प्रश्न माझ्या समोर होता. आपल्या आयुष्यात आर्थिक,मानसिक अशा सगळ्या बाजूने पुढे काय करायचं? काहीच राहिलं नाहीये असं वाटायचं. पदरात दोन मुलं त्यांना कसं मोठं करायचं? हा प्रश्न होता. यासारखे असंख्य प्रश्न मनात होते", असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत बसले होते. त्यावेळी स्वानंदी माझ्या जवळ आली आणि ‘‘मम्मी पप्पा कुठे गेले?’ असा प्रश्न विचारला. तेव्हा अभिनय म्हणाला, ‘थांब, तुला दाखवतो, इकडे ये.’ मग तो तिला खिडकीजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, ‘ते आकाशात स्टार्स दिसतायत ना, त्यातले एक आपले पप्पा आहेत.’ हे पाहून मला असं वाटलं की, अरे हा एवढासा मुलगा आहे आणि त्याला इतकी अक्कल आहे. आपल्या बहिणीला तो इतकं काही सांगतोय. अभिनयने स्टार दाखवल्यानंतर 'आपले पप्पा परत कधी येणार?' असा प्रश्नही लगेच स्वानंदीने विचारला. त्यावर अभिनयने उत्तर सुद्धा दिला. ‘तू दहावीला गेल्यावर आपले पप्पा परत येणार,’ असं अभिनयने तिला सांगितलं. पण जेव्हा स्वानंदी दहावीला गेली तोपर्यंत तिला कळलं होतं की, आपले पप्पा काही परत येणार नाहीत. पण तो दिवस आणि ती रात्र माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होती.’’ असा खुलासा प्रिया यांनी केला आहे."