उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये झालेल्या गॅंगरेपवरून देशभरातील जनता संतापली आहे. १९ वर्षाच्या तरूणीवर निर्दयीपणे अत्याचार केल्यावर तिचा मृत्यू झाला. या घटनेने पुन्हा एकदा निर्भया प्रकरणाच्या वेदनादायी आठवणी ताज्या झाल्या. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही हाथरसमधील घटनेवर राग व्यक्त केलाय. याच पाठोपाठ मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारही या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत. अभिनेता प्रियदर्शन जाधवनेही या घटनेवर संताप व्यक्त करत थेट यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर त्यानेही एका पाठोपाठ सलग दोन संतप्त पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये “तू बोलू नयेस म्हणून तुझी जीभ कापली……………..#निशब्द”, असं कॅप्शन देत या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.तर दुस-या पोस्टमध्ये उत्तरप्रदेशमधील सरकारची लाज वाटते अशा अशयाची पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला आहे.
हाथरस घटनेप्रती मनस्ताप आणि संताप व्यक्त करत या क्रूर कृत्याचा हेमंत ढोमेनेही निषेध केला आहे. ट्वीट करत त्याने म्हटले आहे की, ''भयानक! अमानुष! संतापजनक! भीषण!!!! माणुसकीला अतिशय गलीच्छ पातळीवर नेणारी घटना! या नालायक नराधमांना जबर शिक्षा व्हायला हवी!
१४ सप्टेंबरला झाला होता सामूहिक बलात्कार
हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.