Join us

"त्या राजकीय पोस्टनंतर आईवडिलांना धमकीचा फोन आला आणि...", प्रियदर्शन जाधवने सांगितला 'तो' प्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 1:19 PM

प्रियदर्शनच्या आईवडिलांना धमकी मिळाल्याचा खुलासा प्रियदर्शनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने केला. 

उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेता प्रियदर्शन जाधवने मराठी कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. विनोदी कलाकार म्हणून ओळख मिळवलेल्या प्रियदर्शनने विविधांगी भूमिका साकारून अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयाबरोबरच प्रियदर्शन त्याच्या बेधडक स्वभावासाठीही ओळखला जातो. समाजातील घडामोडींवरही तो परखडपणे त्याचं मत मांडताना दिसतो. पण, अशाच एका पोस्टमुळे प्रियदर्शनच्या आईवडिलांना धमकी मिळाल्याचा खुलासा प्रियदर्शनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला. 

प्रियदर्शनने नुकतीच 'अजब गजब' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने घडलेला प्रसंग सांगितला. तो म्हणाला, "मी राजकीय पोस्ट बघणं ठरवून बंद केलं आहे. खरं तर मला राजकारणात भयंकर इंटरेस्ट आहे. या क्षेत्रात नसतो तर मी नक्कीच राजकारणात असतो. पण, माझ्या आईवडिलांना ते आवडलं नसतं. कारण, त्यांचं असं म्हणणं होतं की काही कर पण राजकारणात जाऊ नकोस. माझ्या आईवडिलांनी मला कोणत्याच गोष्टीसाठी अडवलं नाही. त्यामुळे त्यांची ही एक गोष्ट मी ऐकली पाहिजे, असं मला वाटतं".

"पूर्वी मी राजकीय घटनांबद्दल पोस्ट लिहायचो. आता मी तेदेखील पूर्णपणे बंद केलं आहे. एक-दोनदा अशा राजकीय पोस्टमुळे माझ्या आईवडिलांना धमकीचे फोन गेले. माझे आईवडील कोल्हापुरात असतात आणि मी इकडे मुंबईत असतो. फोनवर त्यांना धमकी देण्यात आली होती. त्याला मुंबईतून बाहेर पडू द्या. त्याचे पायच कापून टाकू...असा धमकीचा फोन आला. मला यात घाबरण्यासारखं काहीच नाही आणि मी कोणाला घाबरतही नाही. पण, ते जर घरापर्यंत जात असेल. त्यामुळे आपले आईवडील, नातेवाईक, मित्र यासगळ्यांना त्याचा त्रास होत असेल. तर मग मी ते न केलेलं बरं...म्हणून मी आता राजकीय पोस्ट करत नाही," असं प्रियदर्शन म्हणाला. 

दरम्यान, प्रियदर्शन 'शक्तीमान' या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात त्याने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'शक्तीमान' सिनेमात आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. २४ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.  

टॅग्स :प्रियदर्शन जाधवमराठी अभिनेतासेलिब्रिटी